पातूर तालुक्यातील वाहाळा बु. येथील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेले सचिव नंदकिशोर इंगळे यांची प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांना वाहाळा बु. येथे पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. असे असताना सदर ग्रामसेवक मुख्यालयात हजर राहत नाहीत. त्यामुळे विकास थांबला आहे. सचिव गावात फिरकत नाहीत. काही कामानिमित्त ग्रामस्थांनी फोन लावला की, फोन उचलत नाहीत. गोरगरीब नागरिक विविध कामांकरिता ग्रामपंचायत कार्यालयात येतात; परंतु सचिव नेहमी गैरहजर असल्याने ग्रामस्थ ताटकळत बसतात. ग्रामस्थांचे काम करण्यास टाळाटाळ करतात. घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनांची नागरिकांना माहिती न दिल्यामुळे अनेकांची घरकुले प्रलंबित आहेत. दाखला मिळण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यांच्याविरुद्ध अनेकदा ग्रामस्थांनी तक्रारी केल्या; परंतु वरिष्ठांकडून दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे सचिव नंदकिशोर इंगळे यांची तत्काळ बदली करून दुसऱ्या सचिवाची नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
वाहाळा बु. येथील सचिवाची बदली करा, अन्यथा उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 6:11 AM