अकोला: गत महिनाभरापासून नादुरुस्त असलेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील क्ष-किरण विभागातील सीटी स्कॅन मशीनची दुरुस्ती हॉलंड देशातून बोलावण्यात आलेल्या ‘कॅथोड पॉवर मोड्युल’ या सुट्या भागाच्या प्रतीक्षेत रखडलेली होती. कुरियर सेवेद्वारा हॉलंडहून मुंबई येथे आलेला हा सुटा भाग गुरुवारी अकोल्यात दाखल झाल्यानंतर शुक्रवारी सीटी स्कॅन मशीनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, शनिवारी ही मशीन रुग्णसेवेत रुजू होण्याची शक्यता आहे.सर्वोपचार रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन गत २० जुलैपासून बंदच आहे. या मशीनमधील ‘रोटर बॅलन्स किट’, ‘क्सिट’ स्ट्रॅप पॅड असेम्ब्ली, जनरेटर सर्व्हिस टूल्स व कॅथोड पॉवर मोड्युल हे सुटे भाग निकामी झाले होते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने या सुट्या भागांची मागणी नोंदविली. यापैकी ‘रोटर बॅलन्स किट’, ‘क्सिट’ स्ट्रॅप पॅड असेंम्ब्ली, जनरेटर सर्व्हिस टूल्स हे तीन सुटे भाग चेन्नई येथून मागविण्यात आले. या तिन्ही भागांची ‘डिलिव्हरी’ लवकरच मिळाली. या सुट्या भागांपैकी ‘कॅथोड पॉवर मोड्युल’ हा अत्यंत महत्त्वाचा सुटा भाग हॉलंड येथून मागवावा लागला. या सुट्या भागाच्या प्रतीक्षेत सीटी स्कॅन मशीनची दुरुस्ती रखडली होती. आता या सुट्या भागाची ‘डिलिव्हरी’ मिळाल्यानंतर शुक्रवारी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. शनिवारी मशीन दुरुस्त होण्याची शक्यता असून, मशीन कार्यान्वित झाल्यानंतर रुग्णांना दिलासा मिळणार आहे.‘फॅन्टम हेड’ यवतमाळ ‘जीएमसी’मधूनमशीनच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले फॅन्टम हेड हे उपकरण सर्वोपचार रुग्णालयातून गहाळ झाले आहे. त्यामुळे हे उपकरण यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मागविण्यात आल्याची माहिती आहे.हॉलंडहून आलेला सुटा भाग प्राप्त होताच सीटी स्कॅनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. शनिवारी सीटी स्कॅन मशीन रुग्णसेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. - डॉ. कुसुमाकर घोरपडे, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.