बोरगाव मंजू वनक्षेत्रालगत विझोरा येथील अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. या वन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोही, रानडुक्कर, हरिण या वन्य प्राण्यांचा वावर आहे. रात्रीच्या वेळेस वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांचे नुकसान केले जाते. गतवर्षी सुध्दा वन्य प्राण्यांनी बऱ्याच शेतातील तूर पिकाचे नुकसान केले. या संदर्भात काही शेतकऱ्यांनी अकोला वन विभागाकडे डिसेंबर २०२० ला झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी अर्ज सादर केले होते. शेतातील नुकसानीचे पंचनामे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर नुकसान भरपाईची मदत ५ ते ६ महिन्यांत खात्यात जमा होणे अपेक्षित होते; परंतु एवढा कालावधी लोटूनही मदत मिळाली नाही.
शेतकऱ्यांच्या वन विभागाच्या कार्यालयात चकरा
अकोला येथील वन विभागाच्या कार्यालयात शेतकरी चौकशीसाठी चकरा मारीत आहेत. यावेळी त्यांना अनुदान आले नसल्याचे उत्तर तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांकडून दिले जात आहे. काही शेतकऱ्यांना अर्ज करून दोन वर्षे पूर्ण होऊनसुद्धा त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.