----------------------------
पाणंद रस्त्यांभावी शेतमाल शेतातच!
अकोट : तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शेतरस्त्यांअभावी शेतमाल घरी आणता येत नाही.
------------
गेटची दुरवस्था; बंधाऱ्यात पाणी थांबेना!
वाडेगाव : नदी, नाल्यांचे पाणी अडवण्यासाठी काेल्हापुरी बंधारे बांधण्यात आली आहेत; मात्र या बंधाऱ्यांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत असल्याने काहींना गेटच बसविण्यात आलेले नाही. बंधाऱ्यांमध्ये पाणीच अडवले गेले नसल्याने अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित राहणार आहेत.
---------------
वन्य प्राण्यांचा हैदाेस; पिकांचे नुकसान
पातूर: तालुक्यात वन्य प्राण्यांचा हैदाेस सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणी केली आहे. सध्या गहू, हरभरा पीक अंकुरले आहे; मात्र वन्य प्राणी या पिकात हैदाेस घालत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे.
---------------
रेतीचे अवैध उत्खनन; कारवाईची मागणी
बाळापूर: जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. तरीही रेती घाटांवरून दिवसरात्र उत्खनन करून वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाचा काेट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे रेतीचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाइची मागणी हाेत आहे.
----------------
वीज पुरवठा खंडित; रब्बी हंगाम धाेक्यात
माना/कुरूम : परिसरात गत काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने रब्बी हंगामातील पीके धाेक्यात आली आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यातच वीज पुरवठा खंडित हाेत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
-------------
‘पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवा!’
चिखलगाव: परिसरातील अनेक गावातील पाणंद रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. आधीच पाणंद रस्त्याची रुंदी कमी आहे. त्यातच अतिक्रमणामुळे रुंदी कमी झाल्याने शेतकऱ्यांना शेतमाल घरी आणताना कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
---------------
आलेगाव परिसरात व्हायरल फिव्हरची साथ
आलेगाव : वातावरणातील बदलामुळे परिसरात गत काही दिवसांपासून व्हायरल फिव्हरची साथ सुरू आहे. अनेकांना सर्दी, खाेकला झाला आहे. तसेच तापही येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आराेग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
---------------------
मुंडगाव परिसरात रब्बीची पेरणी आटाेपली!
मुंडगाव: खरीप हंगामात झालेल्या नुकसानातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली आहे. परिसरात यावर्षी गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. परिसरातील जलसाठे तुडुंब भरलेले असल्याने सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने उत्पादनात वाढ हाेण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
-------------------
‘एटीएम’ बनत आहेत काेराेनाचे वाहक
चोहोट्टाबाजार : परिसरातील एटीएममध्ये काेराेना संसर्गाविषयी काळजी घेण्यात येत नसल्याने संसर्ग वाढण्याची भीती वाढली आहे. एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येत नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
-----------------------------------
ग्रामीण भागात मास्कची ‘ॲलर्जी’!
खानापूर: काेराेना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी धाेका कायम आहे; मात्र ग्रामीण भागात अनेक ग्रामस्थ विना मास्क फिरत असल्याचे चित्र खानापूर परिसरात आहे. त्यामुळे, ग्रामीण भागात काेराेनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त आहे.