- अतुल जयस्वाल
अकोला : कोरोनाच्या पहिल्या लाटेत ठप्प झालेली रेल्वे आता पूर्णपणे रुळावर आली असून, बहुतांश सर्वच गाड्या पुन्हा सुरु झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग ओसरू लागल्याने प्रवाशांची संख्याही वाढली असून, अकोला स्थानकावरून पुणे, मुंबई व नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आरक्षण फुल्ल असून, प्रतीक्षा यादी मोठी असल्याने अनेकांना वेटिंगवर राहावे लागत आहे.
हावडा - मुंबई या देशातील प्रमुख लोहमार्गावर असलेले अकोला रेल्वे स्थानक हे जंक्शन स्थानक आहे. देशातील विविध भागात जाण्यासाठी येथून गाड्या उपलब्ध आहेत. मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या अनेक गाड्यांचे दररोज अकोला स्थानकावरून आवागमन सुरु असते. लग्नसराई व पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने स्थानकावर गर्दी होत आहे. अशातच एसटीचा संप सुरु असल्याने प्रवासी आता रेल्वेकडे वळले आहेत. त्यामुळे सर्वच गाड्यांमध्ये आरक्षण फुल्ल झाल्याचे चित्र आहे.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
- नागपूर - मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
- गोंदिया - मुंबई विदर्भ एक्सप्रेस
- कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस
- नागपूर - पुणे गरीबरथ एक्सप्रेस
- एलटीटी - शालिमार समरसता एक्सप्रेस
- अहमदाबाद - नागपूर प्रेरणा एक्सप्रेस
- मुंबई - हावडा गीतांजली एक्सप्रेस
या तीन मार्गांवर वेटिंग
अकोला-मुंबई : या मार्गावरील विविध गाड्यांमध्ये २० मार्चपर्यंत ७० ते ११० वेटिंग आहे.
अकोला-पुणे : या मार्गावरील विविध गाड्यांमध्ये २० मार्चपर्यंत ६० ते १२० वेटिंग आहे.
अकोला-नागपूर : या मार्गावरील विविध गाड्यांमध्ये १७ मार्चपर्यंत ५० ते १२५ वेटिंग आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटातून हजारोंची कमाई
कोरोना काळात रेल्वेस्थानकावरील गर्दी कमी व्हावी म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर ३० रुपये करण्यात आले होते. आता पुन्हा प्लॅटफॉर्म तिकीट दहा रुपयांचे करण्यात आले आहे. प्रवाशांना स्थानकावर सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणारे प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करतात. प्लॅटफॉर्म तिकिटाच्या विक्रीतून स्थानकाला साधारणत: ८ ते १० हजार रुपयांची कमाई होते.
अकोल्यात रोज ३ हजारावर प्रवासी
अकोला रेल्वेस्थानकावरून देशाच्या विविध शहरांमध्ये जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. दररोज अंदाजे ३ हजारावर प्रवासी अकोला स्थानकावर येतात. एसटीचा संप असल्याने गत काही महिन्यांपासून रेल्वेस्थानकावर प्रवाशांचा राबता वाढला आहे.
कोणत्या महिन्यात किती रेल्वे
फेब्रुवारी २०२० - ५०
फेब्रुवारी २०२१ - ४५
मार्च २०२० मध्ये बंद झाल्या होत्या रेल्वे
कोरोनाची पहिली लाट झपाट्याने पसरण्यास सुरुवात झाल्यानंतर २२ मार्च २०२० रोजी सरकारने रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जून महिन्यापासून मोजक्या विशेष गाड्या चालविण्यात आल्या. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर हळूहळू विशेष गाड्यांची संख्या वाढविण्यात आली. २०२१ मध्ये सर्व गाड्या नियमित करण्यात आल्या.