अकोला, दि. ३- कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर जिल्हय़ातील शेकडो शेतकर्यांनी गर्दी केली आहे. शुक्रवारपर्यंत नाफेडच्या केंद्रावर २१ हजारापेक्षा जास्त क्विंटल तूर आली असून, शेतकर्यांना मापाची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी ५0 ते ५५ ट्रॉलीतील तुरीचे माप करण्यात आले. अडत्यांकडून तुरीला क्विंटलमागे ४२00 ते ४५00 रुपये दर मिळत आहेत, तर नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीला ५0५0 रुपये दर मिळत असल्याने, शेतकर्यांचा कल शासकीय तूर खरेदी केंद्राकडे अधिक आहे. त्यात शासकीय तूर खरेदी केंद्र बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्याने, जिल्हय़ातील तूर उत्पादक शेतकर्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठय़ा प्रमाणात तूर विक्रीसाठी आणली. नाफेडकडे बारदान्याचा पुरेसा साठा नसल्यामुळे माप केलेली तूर कोठे ठेवायची, असा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु आता बारदान्याची समस्यासुद्धा निकाली निघाली आहे. सद्यस्थितीत बाजार समितीच्या आवारातील दोन्ही बाजूला ७८0 ट्रॉली उभ्या आहेत. एकाच वेळी तूर विक्रीसाठी शेतकर्यांनी गर्दी केल्यामुळे बाजार समिती आणि नाफेडच्या अधिकार्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. तुरीचे माप लवकरच व्हावे, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सुद्धा आपले कर्मचारी व साधने नाफेडच्या मदतीला दिले आहेत. केंद्रावर आलेल्या शेतकर्यांचे माप लवकर व्हावे, यासाठी हमाल, माथाडी कामगारांची संख्यासुद्धा वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत पाच ते सहा ठिकाणी तुरीचे माप होत होते; परंतु आता गुरुवारपासून दहा ते बारा ठिकाणावर तुरीचे माप करण्याची व्यवस्था करण्यात आली. गत आठ दिवसांपासून जिल्हय़ातील शेकडो शेतकर्यांचा माल बाजार समितीच्या आवारात पडून आहे. तुरीचे माप करण्यासाठी बाजार समितीकडून शेतकर्यांना टोकन क्रमांक दिले आहेत. टोकन क्रमांकानुसार शेतकर्यांच्या तुरीचे माप करण्यात येत आहे. तुरीला ५0५0 रुपये एवढा हमीभाव मिळत असल्याने, शेतकरी नाफेडवरच तूर खरेदीसाठी आणत आहेत. त्यासाठी शेतकरी आठ-आठ दिवस मुक्कामी राहत आहेत. क्वचितच शेतकरी खासगी व्यापार्यांकडे तूर विकत आहेत. ढगाळ वातावरणाचा अंदाजयेत्या काही दिवसात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी बाजार समिती आवारात पडून असलेल्या मालाचे नुकसान होऊ नये. यादृष्टिकोनातून शेतकर्यांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि माल झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. नाफेडच्या रकमेसाठी आठ ते दहा दिवस प्रतीक्षातूर खरेदीसाठी नाफेड केंद्राला शेतकरी प्राधान्य देत आहेत. अडत्यांप्रमाणे शेतकर्यांना रोख रक्कम मिळत नाही. नाफेडच्या रकमेसाठी शेतकर्यांना आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करावी लागते. शेतकर्यांच्या खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे आठ ते दहा दिवसांमध्ये रक्कम जमा होते.
२१ हजार क्विंटल तूर मापाच्या प्रतीक्षेत!
By admin | Published: March 04, 2017 2:42 AM