निहिदा : परिसरात गत २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतात बहरलेली पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. तसेच काही भागात पिकांनी माना खाली टाकल्या असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. आठवड्याभरात पाऊस न पडल्यास पिके हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
निहीदा, पिंजर परिसरात सुरुवातीला भागात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. परिसरात १०० टक्के पेरणी आटोपली आहे. त्यानंतर चांगला पाऊस बरसल्याने पिके बहरलेली आहेत. त्यामुळे परिसरात शेतीच्या आंतरमशागतीला वेग आला आहे. गत २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतशिवारातील सोयाबीन, मूग, तूर, आदी पिकांना फटका बसला असून, पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. वाढत्या उष्णतेमुळे शेतातील सोयाबीन पीक कोमजली आहेत. पिंजरसह परिसरातील ६४ खेडेगावात असे चित्र असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पावसाअभावी शेतकरी संकटात सापडले असून, सद्य:स्थितीत शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.