आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुनर्बांधणीसाठी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे सरसावल्या. त्यांनी स्वत: अकोल्यात जिल्हा व शहर कार्यकारिणीचा आढावा घेतला असता आगामी भाजपा-शिवसेनेची विजयी घोडदौड रोखण्यापेक्षा पक्षांतर्गत जुन्या व नवीन पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ताळमेळ नसल्याच्या मुद्यावर कार्यकर्त्यांनी मते मांडली. महापालिकेच्या निवडणूक कालावधीत माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या पक्ष प्रवेशानंतर अनेकांचे प्रवेश अधांतरी आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी राकाँच्या जिल्हा कार्यकारिणीसह विविध सेलमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून, त्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत.तूर खरेदीच्या मुद्यावरून राज्यातील शेतकऱ्यांना नाफेडने अक्षरश: झुलवत ठेवल्याचे चित्र समोर आले. तूर, सोयाबीनला हमीभाव देण्यात शासन अपयशी ठरल्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी तूर, सोयाबीनचे भाव कमी केले. शेतीच्या उत्पादनात वाढ होऊनही हमीभाव मिळत नसल्यामुळे शासनाप्रति शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. आजच्या घडीला राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी अद्यापपर्यंतही जिल्हा प्रशासन असो वा बँकांना पीक कर्जाच्या मुद्यावर शासनाचे दिशानिर्देश प्राप्त नाहीत. त्यात भरीस भर कर्जमाफीचे निकष स्पष्ट नसल्यामुळे शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. शेतकरी सैरभैर झाला असताना स्थानिक पातळीपासून ते राज्यपातळीवरील राजकारणात विरोधी पक्षाच्या भूमिकेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसकडून शासनाला वेठीस धरण्याचे काम होत नसल्याचे दिसून येत आहे. विधान परिषदेत धनंजय मुंडे यांचा प्रभाव अधिवेशनापुरता दिसत असला, तरी त्यामध्ये सातत्य नसल्याचे चित्र आहे. भाजप-शिवसेनेच्या कलगीतुऱ्यावर वर्तमानपत्रात प्रतिक्रिया देण्यापलीकडे राष्ट्रवादीचे नेते सक्रिय नसल्याचा परिणाम ग्रामीण भागातील पक्ष संघटनेवर झाला आहे. सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यांची टांगती तलवार वरिष्ठ नेत्यांवर असल्यामुळे की काय, जणू जिल्हा कार्यकारिणी, राष्ट्रवादी युवक काँगे्रस कार्यकारिणीला अप्रत्यक्षपणे आंदोलने न उभारण्याचे निर्देश दिल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होत आहे. परिणामी, पक्षात सुगीचे दिवस अनुभवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात घालमेल सुरू झाली आहे. पक्ष कोणताही असो, त्यात अंतर्गत हेवेदावे, वरिष्ठ-कनिष्ठ असा भेद आपसूकच निर्माण होतो. यापासून राष्ट्रवादी पक्ष कसा अलिप्त राहू शकतो, राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा जिल्हाध्यक्ष म्हणून विजय देशमुख यांच्या खांद्यावर सोपवल्यानंतर कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे चित्र होते. राष्ट्रवादी पक्षात सहकार लॉबी वजनदार मानल्या जाते. स्थानिक सहकार क्षेत्रातील नेते व नवीन पदाधिकाऱ्यांमधील घडी विस्कटल्याचे चित्र आहे. जनतेशी संबंध नसणारे; परंतु स्वत:च्या उद्योग व्यवसायाला ‘प्रोटेक्शन’म्हणून पक्षात पदाधिकारी म्हणून मिरवणाऱ्यांनी पक्षांतर्गत मतभेद कमी करण्याऐवजी त्यात भर घालण्याचे प्रयत्नच अधिक केल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे जुन्या कार्यकर्त्यांमधील असंतोष खा. सुप्रिया सुळे यांच्या भेटीत उफाळून आला होता. जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्या कार्यशैलीवर समाधानी असल्याचे सांगत खा. सुळे यांनी पक्षांतर्गत विरोधकांना चपराक लगावत पक्षात जो काम करेल तोच टिकेल, अशी भूमिका स्पष्ट केली होती, तसेच पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे निर्देश जिल्हाध्यक्षांना दिले होते. त्यानुषंगाने जिल्हाध्यक्ष विजय देशमुख कामाला लागले असून, पक्षातील विविध सेलच्या जुन्या-नवीन पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतील. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी दिली जाणार असून, पक्षातील शीर्षस्थ नेत्यांकडेही विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी सोपविली जाईल. प्रवेश लांबला; कार्यकर्त्यांना प्रतीक्षामहापालिका निवडणुकीच्या काळात माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ क रून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. त्यांचे चिरंजीव संग्राम गावंडे यांनी युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी तेसुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चेला ऊत आला होता. संग्राम गावंडे यांची युवकांवरील पकड लक्षात घेता त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत. राज्यात पुनर्बांधणीसाठी प्रयत्नपक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे सरसावल्या आहेत. सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्यावर खा. सुळे कमालीच्या आग्रही असून, याविषयी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर त्यांची करडी नजर असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या ‘शिवसंपर्क’ तसेच ‘मी कर्जमुक्त होणारच’ अभियानाच्या धर्तीवर सावकारग्रस्त शेतकऱ्यांना सावकारमुक्त करण्याच्या माध्यमातून पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
राष्ट्रवादीला फेरबदलाची प्रतीक्षा!
By admin | Published: July 14, 2017 1:16 AM