अकोला: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक, संशोधनवृत्ती जागविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत. विज्ञान विषयामध्ये संशोधन व विकासाच्या दृष्टीने इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे आयोजन ही विद्यार्थ्यांंसाठी मोठी संधी आहे. अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी मदत होते. विविध प्रकारचे विज्ञान प्रकल्प विद्यार्थी तयार करतात. त्यांच्यासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून संशोधक, चिकित्सक विद्यार्थी समोर येतात. त्यांच्या प्रकल्पांच्या माध्यमातून देशविकासाला हातभार लागू शकतो. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी केले. मेहरबानो विद्यालयाच्या सभागृहात ८ ऑगस्टपासून सुरू झालेल्या इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे होत्या. प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर उज्ज्वला देशमुख यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, निरंतर शिक्षणाधिकारी वैशाली ठग, मुख्याध्यापिका मीनल भेंडे, एम.डी. चोपडे, उपशिक्षणाधिकारी दनाडे, गटशिक्षणाधिकारी बाळापूर गणगणे, ईश्वरकर (मूर्तिजापूर), गटशिक्षणाधिकारी शिंदे (पातूर), शिक्षण उपनिरीक्षक अश्विन मानकर, दिनेश दुतंडे, अरुण शेगोकार, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, सचिव बळीराम झामरे यांची उपस्थिती होती. इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनामध्ये अकोला जिल्हय़ातील १२0 शाळांमध्ये १६0 विद्यार्थी आणि अमरावती जिल्हय़ातील ४४ शाळांमधून ५८ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांंनी सौरऊर्जा, पर्यावरण, डिजिटल इंडिया, हरितऊर्जा, अन्नसुरक्षा आणि पोषण विषयावर आपले संशोधनात्मक विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण केले आहे. प्रदर्शन १0 ऑगस्टपर्यंत जी.एस. कॉन्व्हेंट आणि स्वावलंबी विद्यालयात होत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती जागवा - सीईओ विधळे
By admin | Published: August 09, 2016 2:25 AM