अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून ग्रामीण विकासाला दिशा दिली. ग्रामगीतेमध्ये मातृशक्तीला स्थान देत घर, कुटुंबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. ग्रामगीतेतील विचार महिलांनी आत्मसात करून त्या विचारांनुसार वाटचाल करण्याची गरज आहे, तसेच राष्ट्रसंतांचे विचार मनामनात रुजविण्याची गरज असल्याचे मत सुहासिनी धोत्रे यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवामध्ये शनिवारी दुपारी राष्ट्रसंतांच्या साहित्यातील मातृशक्ती विषयावर आयोजित महिला संमेलनामध्ये प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. ममता इंगोले होत्या. संमेलनामध्ये वक्ते म्हणून माजी महापौर उज्ज्वला देशमुख, प्रा. डॉ. पूजा सपकाळ, मंजूषा सावरकर, जयश्री बाठे, माजी नगरसेविका पुष्पा गुलवाडे, साक्षी पवार, चैताली खांबलकर, कोमल हरणे व पूर्वा चतारे होत्या.त्यावेळी प्रा. डॉ. ममता इंगोले यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या साहित्यामध्ये महिलांचा विचार केला आहे. महिलांनी शिक्षित होऊन कुटुंबाला पुढे न्यावे, मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांना घडवावे, शासनाने महिलांना ५0 टक्के आरक्षण दिले असतानाही महिला पुढे येत नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी पुढे यावे, मुला-मुलींना चांगले संस्कार द्यावेत आणि ग्रामगीतेचा महिलांनी अभ्यास केला, तर त्यांना प्रगतीच्या अनेक वाटा सापडतील. ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंतांनी महिलांच्या उन्नतीवर भर दिला आहे. त्यामुळे राष्ट्रसंतांच्या विचारांचा घरामध्ये जागर झाला पाहिजे, असे मत प्रा. डॉ. ममता इंगोले यांनी मांडले. माजी महापौर उज्ज्वला देशमुख यांनी सर्वत्र महिला, युवतींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. महिला अबला नसून, सक्षम सबला आहे. महिलांनी सक्षम, आत्मनिर्भर बनून अन्याय, अत्याचाराचा विरोध करायला शिकले पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीसुद्धा ग्रामगीतेतून महिलांना हाच सल्ला दिल्याचे मत त्यांनी मांडले. माजी नगरसेविका पुष्पा गुलवाडे यांनी राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहून ग्रामविकासासोबतच महिलांनासुद्धा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला; परंतु आम्ही महिला त्यातून काही शिकत नाही. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी सावित्रीबार्इंना शिक्षण देऊन तिच्यात क्रांतिज्योती निर्माण केली. सावित्रीबार्इंनी अनंत हालअपेष्टा सहन करून मुलींना शिकविण्याचा प्रयत्न केला. मुली शिकल्या पाहिजेत, यासाठी शाळा काढली. सावित्रीबाई, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवींचा आदर्श महिलांनी बाळगून, मुलांना घडवावे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रांजली गीते हिने केले.
डॉक्टरांनी सांगितला आरोग्याचा मूलमंत्र!राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवामध्ये दुपारी आरोग्याचा मूलमंत्र कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अभय पाटील, किडनी विकार तज्ज्ञ डॉ. सदानंद भुसारी, डॉ. विवेक देशपांडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. राम शिंदे, डॉ. राजेश काटे, डॉ. अजय उपाध्याय, डॉ. सुरेश राठी यांनी सहभाग घेत, गुरुदेव भक्तांना विविध आजारांबाबत मार्गदर्शन केले.