कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वीच शासनस्तरावर लसीच्या साठवणुकीच्या तयारीला सुरुवात झाली होती. त्या अनुषंगाने केंद्र शासनातर्फे अकोल्याला ४० क्युबिक मीटर क्षमतेचा वॉक इन कूलर मंजूर झाला होता, तसेच विभागासाठी ८२ लहान ‘आईस लाइण्ड रेफ्रिजरेटर’ म्हणजेच ‘आयएलआर’ दिले जाणार होते. विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये लसींचा पुरवठा केल्यानंतर लस योग्य तापमानात राहावी, या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात विभागासाठी ८२ लहान आयएलआर पुरविण्यात आले होते. त्याचा लाभ कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत ग्रामीण भागातील केंद्रांवर झाला. विभागासाठी मिळणारी लस सर्वप्रथम अकोल्यात येते. येथून ही लस विभागातील पाचही जिल्ह्यांना वितरित केली जात असल्याने या लसी साठवूण ठेवण्यासाठी प्रस्तावित असलेला ४० क्युबिक मीटर क्षमतेचा ‘वॉक इन कूलर’ बुधवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयात कार्यान्वित करण्यात आला. यावेळी प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, जीव वैद्यकीय अभियंता नितीन सावळे, औषधनिर्माण अधिकारी राजेंद्र इंगळे, मुख्य औषधनिर्माण अधिकारी प्रदीप पहाडे, सतीश जोशी, नंदकिशोर शिवरकार, मनोज श्रीवास्तव, प्रवीण विभूते, सागर भगवे, गोपाल रायकर, मो. मुश्ताक यांची उपस्थिती होती.
कोविड लसीच्या साठवणुकीसाठी ‘वॉक इन कूलर’ कार्यान्वित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:14 AM