अकोला : राज्यभरासह जिल्ह्यामध्ये अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. त्यामध्यमातून अपघाताच्या घटना टाळता येऊ शकतात. आता प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्त्यावर ‘वॉक ऑन राईट’व हेल्मेट जनजागृतीसाठी मंगळवार, दि.१३ फेब्रुवारी रोजी शहरात ‘वॉकेथॉन’चे आयोजन केले आहे.
हेल्मेटविषयी जनजागृती ‘वॉकथॉन’मधून करण्यात येणार असून, त्याचा प्रारंभ वसंत देसाई क्रीडांगणातून मंगळवारी सकाळी होणार आहे. शहरातून अग्रसेन चौक, दुर्गा चौक, नेकलेस रोड, नेहरू पार्क चौक, अशोक वाटिका, बसस्थानक, अग्रसेन चौक असा ‘वॉकेथॉन’चा मार्ग राहणार असल्याची माहिती आहे. अधिकारी व कर्मचारी, तसेच नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.