कुरूम : भरकटलेल्या माकडाने कुरूम गावात शिरून चार दिवसांपासून धुमाकूळ घालत तीन ते चार जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये ग्रामपंचायत सदस्याचा समावेश आहे. यावेळी माकडाला मोठ्या शिताफीने पकडून वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक मुलांचे वसतिगृह व परिसरात माकडाने गत चार दिवसांपासून धुमाकूळ घातला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वसतिगृहाचे स्वयंपाकी म्हणून सुनील निंघोट कुटुंबासह वसतिगृहात राहत असल्याने चार दिवसांपासून माकडाने कुटुंबाच्या नाकीनऊ आणले होते. यावेळी सुनील निंघोट यांनी मोठ्या शिताफीने माकडावर दोराचा फास टाकून पकडले. याबाबतची वनविभागाला माहिती दिल्यानंतर मूर्तिजापूर वनविभागाचे अधिकारी सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कुरूम बिट वनरक्षक पी.डी.हरणे, रेस्क्यू टीमचे पवन भगत, अजमत खा पठाण यांनी घटनास्थळ गाठून माकडाला ताब्यात घेतले. यावेळी अनंता विरुळकर, सुनील निंघोट, रोहित मांडवे, शेषनारायण ढोरे, किरण बन्नोरे, साहेबराव रतेकर यांनी सहकार्य केले.