आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात आल्यास गावकऱ्यांना पाणीटंचाई भासणार नाही; परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. हाता गावात पाणीपुरवठ्यासाठी एकच बोअरवेल आहे. या बोअरवेलवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तसेच विजेचा दाब कमी असल्यामुळे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतीने आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत सरपंच कविता रवी मनसुटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विजेचा दाब कमी असल्याने पाणीपुरवठा करण्यास अडचण येत असल्याचे सांगितले.
विजेचा दाब कमी असल्याने नागरिक त्रस्त
हाता : ३३ केव्ही उपकेंद्र कारंजा रम.अंतर्गत ग्रामीण भागामध्ये वीजपुरवठा होत असून हाता गावामध्ये विजेचा दाब कमी प्रमाणात राहत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेच्या कमी दाबामुळे पिठाची गिरणी, कूलर, पंखे बंद आहेत, तसेच पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ग्रामीण भागामधील वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सागद, नागद, निंबा, हाता, कारंजा रम. अंदुरा, नया अंदुरा, कवठा बहादुरा, निंबा, हिंगणा, मोखा, वझेगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.