अकोला: शहरातील प्रमुख रस्ते असो वा गल्लीबोळात मोकाट गुरेढोरे, कुत्रे व डुकरांनी उच्छाद मांडला आहे. जुने शहरातील पोळा चौक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने सहा वर्षांच्या चिमुकल्यासह दहा जणांचे लचके तोडल्यानंतर महापालिकेच्या कोंडवाडा विभागाला जाग आली. गुरुवारी या विभागातील कर्मचाऱ्यांनी पोळा चौक परिसरातून दहा ते बारा भटक्या कुत्र्यांना बंदिस्त केले असले तरी पिसाळलेला कुत्रा मनपाच्या तावडीत सापडलाच नसल्याची माहिती आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.शहरात सर्वत्र मुक्तपणे संचार करणाºया मोकाट जनावरांमुळे वाहनधारक अकोलेकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुख्य रस्त्यांच्या मधोमध ठिय्या मांडणाºया जनावरांमुळे वाहनधारकांच्या अपघातात वाढ झाली आहे. हा प्रकार कमी म्हणून काय, गल्लीबोळात मोकाट कुत्रे व डुकरांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिकांना फिरणे मुश्कील झाले आहे. अनेक ठिकाणी भटके कुत्रे व डुकरांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरातील लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच, मोकाट गुरेढोरे, कुत्रे व डुकरांच्या उच्छादामुळे सर्वसामान्य अकोलेकरांच्या जीविताला धोका निर्माण झाला असताना महापालिका प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे....तर नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत!मोकाट गुरे, कुत्रे व डुकरांमुळे अकोलेकरांच्या आरोग्याला व जीविताला धोका निर्माण झाला असताना सत्ताधारी भाजपसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ व अपक्ष नगरसेवकांना कर्तव्याचा विसर पडल्याचा आरोप अकोलेकर करीत आहेत. निवडणुकीच्या काळात मतांसाठी जोगवा मागणारे नगरसेवक आता कोणत्या बिळात दडून बसले आहेत, असा संतप्त सवाल उपस्थित करून अकोलेकरांनी नगरसेवकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.अन् आयुक्तांनी बैठक घेतलीच नाही!मोकाट कुत्रे आणि डुकरांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक अजय शर्मा यांनी आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे केली होती. त्यावर आयुक्तांनी पोलीस प्रशासनाची मदत घेण्याच्या उद्देशातून बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. मागील पाच महिन्यांमध्ये आयुक्तांनी बैठक घेतलीच नसल्याचे समोर आले आहे.
महापौर साहेब, जरा लक्ष देता का?भाजपने ‘अच्छे दिन’चे आश्वासन दिले होते. भाजपच्या आश्वासनावर विश्वास ठेवत अकोलेकरांनी मनपातील सत्ता भाजपच्या ताब्यात दिली. आगामी दिवसांत विधानसभेची निवडणूक आहे. आज रोजी शहरात दर्जाहीन विकास कामे होत आहेत. दुसरीकडे भटके कुत्रे, जनावरे व डुकरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या दुर्लक्षामुळे शहरवासीयांचा जीव व आरोग्य धोक्यात सापडल्याची परिस्थिती असताना महापौर साहेब, जरा लक्ष देता का, असा उद्विग्न सवाल सर्वसामान्य अकोलेकर उपस्थित करू लागले आहेत.कोंडवाडा विभागाचे ‘आॅडिट’ का नाही?कोंडवाडा विभागाने मागील तीन वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांना पकडण्याचा कंत्राट गोमासे नामक कंत्राटदाराला दिला आहे. कंत्राटदार दररोज कुत्रे पकडत असल्याचा दावा हा विभाग करतो. असे असेल तर शहरात कुत्र्यांचा वावर कसा, असा प्रश्न उपस्थित होऊन या विभागाचे ‘आॅडिट’ करण्याचे धाडस प्रशासन करणार का, याकडे लक्ष लागले आहे.