अकोला : शहरातील अनेक भागात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रात्री कुत्र्यांचे भुंकणे, विचित्र आवाज काढणे, परिसरात घाण करणे याला नागरिक कंटाळतात. कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा, हेच कळत नाही. अशातच अकोल्यातील काही भागात नागरिकांनी कुत्र्यांना हुसकावून लावण्यासाठी नवीनच शक्कल लढविली आहे. त्यामुळे अनेक गल्ल्यांमध्ये कुत्र्यांचे फिरकणेच बंद झाले आहे.कुत्रा म्हटला, की अनेकजण घाबरतात. त्याच्यापासून सुटका करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. शहरात अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. रात्री उशिरा घरी जाताना तर अनेकदा कुत्रे पाठलाग करतात. घराजवळील गल्लीबोळांमध्ये कुत्र्यांचे जोरजोरात भुंकणे, विचित्र आवाज काढणे याला नागरिक त्रासतात. अनेकदा कुत्र्यांमागे दगड फिरकावून त्यांना हाकलून लावले जाते; परंतु काही वेळानंतर ही कुत्रे पुन्हा येतात. या कुत्र्यांना कसे हुसकावून लावावे, याचाच विचार अनेकजण करतात. आता अकोल्यातील खरप, मोठी उमरी, गजानन नगर, रणपिसे नगर भागातील कुत्र्यांना हाकलून देण्याची नामी शक्कल शोधून काढली आहे, त्यामुळे गल्लीबोळात आता कुत्र्यांचे फिरकणेच बंद झाले आहे.काय आहे ही नामी शक्कल!खरप, मोठी उमरी, गजानन नगर, रणपिसे नगर भागातील नागरिकांनी कुत्र्यांना हुसकावून लावण्यासाठी मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटलीमध्ये पाणी घेऊन त्यात कुंकू मिसळल्या जाते आणि लाल भडक झालेल्या पाण्याची ही बाटली घराच्या फाटकाजवळ, कम्पाउंडला लटकविल्या जाते. लाल पाण्याच्या बाटलीमुळे कुत्रे परिसरात फिरकतच नाही, असे अनेकांनी सांगितले. या लाल पाण्यात अशी काय जादू आहे की कुत्रे या लाल पाण्याला घाबरतात. याचे वैज्ञानिक कारण पुढे आलेले नाही; मात्र कुत्रे या कुंकवाच्या लाल पाण्याला घाबरतात. ही वस्तुस्थिती आहे.कोलकोता येथेही केले होते असे प्रयोग!कुत्र्यांना हुसकावून लावण्यासाठी कोलकोता महानगरात हजारो लोकांनी अशा बॉटल घरासमोर टांगल्या होत्या. काही दिवस कुत्रे फिरकले नाहीत; परंतु नंतर त्यांना सवय झाल्यावर ते त्या गल्लीबोळांमध्ये भटकायला लागले, अशी माहितीही डॉ. गोपाल मंजुळकर यांनी दिली.नवीन काहीतरी दिसते म्हणून तेवढ्यापुरते कुत्रे त्या लाल पाण्याच्या बॉटलला भितात; परंतु ती भीती निघून गेल्यावर त्यांना त्या लाल पाण्याचे काहीच वाटत नाही. याला काहीही वैज्ञानिक आधार नाही, हा एक प्रयोग आहे.डॉ. गोपाल मंजुळकर, पशुतज्ज्ञ.