अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपकडून एखादे युद्ध लादले जाऊ शकते. ते न झाल्यास आरक्षणाच्या मुद्यांवर समर्थक-विरोधकांमध्ये दंगली घडवून आणीबाणीही लागू केली जाऊ शकते, असा इशारा भारिप-बमसंचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे समाधान करताना दिला.शनिवारी सायंकाळी समाजमाध्यमामध्ये त्यांनी थेट संवाद साधला. यावेळी विविध मुद्यांवर त्यांनी मते व्यक्त केली. सत्ताधारी भाजपकडून देशावर युद्ध लादले जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही बाब मांडली. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जाईल, त्यामध्ये नफ्या-तोट्याचे गणित मांडून शेजारच्या राष्ट्राशी युद्ध केले जाऊ शकते. ते न जमल्यास देशांतर्गत आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून, समर्थक आणि विरोधकांच्या दंगली घडवल्या जातील, त्यातून आणीबाणीची परिस्थिती निर्माण करत ती लागू केली जाईल, अशी दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी असल्याचे ठरवण्यात आले. त्याचवेळी देशातील संघविरोधक, आंबेडकरवादी काहीच बोलायला तयार नाहीत, हा दुटप्पीपणा आहे. तो समजून घेतला पाहिजे, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले. काँग्रेस, भाजपशिवाय तिसरा पर्याय उभा केला, तर लोकांचा सहभाग मिळत नाही. लोकांनी तिसरा पर्याय स्वीकारल्यास या दोघांनाही वठणीवर आणणे कठीण नसल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसची एवढी वाताहत होत असतानाही प्रादेशिक पक्षांना गृहित धरण्याचे धोरण सुरूच आहे. प्रादेशिक पक्ष सातत्याने काँग्रेसला प्रस्ताव देतात, चर्चेची मागणी करतात. काँग्रेस काहीच बोलायला तयार नसते. त्यामुळे येत्या निवडणुकीत मोदी हटावमध्ये काँग्रेसचीच भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही ते म्हणाले. आधारभूत किमतीचे पुन्हा गाजरशेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याबाबत प्रधानमंत्री मोदींनी घोषणा केली. ती करताना अंमलबजावणी कशी होईल, हे सांगितले नाही. केंद्र शासनाने खरेदी यंत्रणा असलेल्या भारतीय खाद्य निगमच्या सर्व गोदामांची विक्री केली आहे, आता कोणत्या यंत्रणेमार्फत खरेदी केली जाईल, हे न सांगितल्याने आधारभूत किमतीचे गाजर दाखवल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.