अकोला: धावपळीच्या आयुष्यात वेळेला महत्त्व दिले जात असले, तरी प्रत्येक जण आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसतो. म्हणूनच अनेकदा हात न धुताच खाद्य पदार्थांचे सेवेन केले जाते; परंतु हा प्रकार संसर्गजन्य आजारांसोबतच इतर विकारांसाठीही कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे कुठलाही खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी हात धुण्यासाठी किमान २० सेकंदाचा वेळ द्यावा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.धावपळीच्या आयुष्यात बहुतांश लोक चुकीच्या सवयी अंगवळणी लावून घेतात. त्यातलीच एक चुकीची सवय म्हणजे हात न धुताच अन्नपदार्थांचे सेवन करण्याची आहे. वाढलेली नखे व त्यातील मळ आरोग्यासाठी घातकच ठरतो; परंतु याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते व विविध संसर्गजन्य तसेच पोटाशी निगडित आजारांना सामोरे जावे लागते. यापासून बचावासाठी नियमित स्वच्छ हात धुणे हाच सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. हात धुतले म्हणजे झाले, असे नाही. बहुतांश लोक चुकीच्या पद्धतीने हात धुवत असल्यानेही आरोग्यावर दुष्परिणामांचे संकट कायम राहते. हात धुण्याची एक विशिष्ट पद्धत असून, त्यासाठी किमान २० सेकंदांचा वेळ आवश्यक आहे.
हात कधी धुवावेत?
- जेवण बनवताना, जेवताना आणि जेवण वाढताना आणि यापूर्वी हात धुऊन घ्यावेत
- शौचास जाऊन आल्यानंतर हात धुणे आवश्यक
- शिंकल्यानंतर हात धुवावेत
- आपल्या बाळाचे नाक स्वच्छ केल्यानंतर हात धुणे गरजेचे
- शौचास गेल्यानंतर किंवा डायपर बदलल्यानंतर
- पाळीव प्राण्यांसोबत खेळल्यानंतर हात जरूर धुवावेत
- आजारी व्यक्तीच्या भेटीनंतर
असे धुवा हात, रोगांवर करा मातसुरुवातीला हात स्वच्छ आणि कोमट पाण्याने ओले करा. यानंतर साबण लावून हात २० सेकंदांपर्यंत व्यवस्थित एकमेकांवर चोळा. या प्रक्रियेत हातांसहित तळवे, हाताचा मागील भाग, बोटे आणि नखेदेखील स्वच्छ झाली पाहिजेत. यानंतर हात पाण्याने स्वच्छ करा, एका कापडाने हात पुसून घ्यावा. हात पुसण्यासाठी स्वत:च्याच रुमाल किंवा टॉवेलचा वापर करावा.हात धुण्यासाठी केवळ काही सेकंद योग्य पद्धतीने दिल्यास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे नियमित स्वच्छ आणि योग्यरीत्या हात धुतवावे, जेणेकरून संसर्गजन्य आजारांसह इतर आजारांपासून मुुक्तता मिळेल.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला