वाशिम : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीत वाशिम येथील स्वच्छतेचा रोबोट ( यंत्र मानव) अवतरला असून, वारीतील वारकर्यांचे तो लक्ष वेधून घेत आहे. वाशिम येथील शिक्षक गोपाल खाडे यांनी हा रोबोट साकारला असून ते यामार्फत लोकांना स्वच्छतेचे संदेश देत आहेत.राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता दिंडीत वाशिमसह १६ जिल्हा परिषदेचे कलापथक सहभागी झाले आहेत. स्वच्छ भारत मिशनच्यावतीने वाशिम येथील गोपाल खाडे यांनी स्वत: स्वच्छतेचा रोबोट साकारला असून ते यावर्षी स्वच्छता दिंडीत सहभागी झाले आहेत. ते कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे शिक्षक असून शासनाच्या वेगवेगळ्या अभियानात ते उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. वाशिम जिल्ह्यात त्यांनी स्वच्छतेच्या अनेक उपक्रमात भाग घेतला होता. त्यांच्या कामाची दखल घेऊन वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी गणेश पाटील आणि उपमुख्य कायर्कारी अधिकारी महेश पाटील यांनी त्यांना राज्याच्या स्वच्छता दिंडीत पाठविले आहे. असा आहे स्वच्छतेचा रोबोटहुबेहूब रोबोटच्या आकाराचा वेश परिधान करुन त्यावर स्वच्छतेचे संदेश रंगविण्यात आले आहेत. रोबोटच्या डोक्यावर 'तुझं गावच नाही का तीर्थ' असे लिहिलेले असून पोटावर 'व्वा वाशिम- स्वच्छ वाशिम' असा बोर्ड लावला आहे. पाठीवर, हाता-पायांवरही पाणी व स्वच्छतेविषयी संदेश छापण्यात आले आहे. असा हा रोबोटचा वेश परिधान करुन खाडे हे यंत्न मानवाच्या आवाजात लोकांशी संवाद साधतात. लोकांशी हस्तांदोलन करतात. रोबोटच्या लकबीत हालचाली करतात. आपल्या विशिष्ट शैलीच्या माध्यमातून रोबोट हा वारीतील लोकांना स्वच्छतेचे संदेश देतो. उघड्यावर शौचास केल्याने महिलांची अब्रू जाते आणि आरोग्याला बाधा पोचते असे तो सांगतो.
पंढरपूरच्या वारीत अवतरला वाशिमचा स्वच्छतेचा रोबोट!
By admin | Published: July 06, 2016 2:47 AM