नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर साठवणूक केल्या जाणाऱ्या कचऱ्याची तात्पुरती विल्हेवाट लावण्यासाठी २०१७ मध्ये ११ महिन्यांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर पाेकलेन मशीन सुरू केली हाेती. त्यानंतर या मशीनला मुदतवाढ न देता आजवर सुमारे साडेतीन काेटी रुपयांचे देयक प्रशासनाने अदा केली आहेत. याविषयी मनपा आयुक्त निमा अराेरा यांनाही अंधारात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, मंगळवारी स्थायी समितीसमाेर हा विषय पटलावर आला असता सेनेचे गटनेता राजेश मिश्रा, काॅंग्रेसचे नगरसेवक पराग कांबळे, इरफान खान यांनी प्रशासनाच्या व सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. नगरसेवकांनी पाेकलेन मशीनच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले असता प्रशासन समाधानकारक खुलासा करू शकले नाही. मनपात मानधन तत्त्वावर ११५ मानसेवी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली. यावेळी सभापती संजय बडोणे, गटनेते राजेश मिश्रा, उपायुक्त पंकज जावळे, नगर सचिव अनिल बिडवे आदी उपस्थित होते.
माेकाट श्वानांचे हाेणार निर्बीजीकरण
शहरातील मोकाट श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणे व श्वानदंश रोगप्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमासाठी स्वयंसेवी संस्था तसेच प्राणी मित्रांमार्फत प्राप्त प्रस्तावास २५ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.
अधीक्षक, झोन अधिकाऱ्याची सेवा संपुष्टात
मनपात १९९८पासून मानसेवी तत्त्वावर कार्यरत व मालमत्ता विभागात अधीक्षक पदावर सेवारत संदीप गावंडे व पश्चिम झोनचे क्षेत्रिय अधिकारी राजेंद्र टापरे यांची सेवा संपुष्टात करण्याचा प्रस्ताव भाजप नगरसेवक अनिल मुरुमकार यांनी मांडला असता ताे मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाला सेनेचे सदस्य राजेश मिश्रा, इरफान खान यांनी कडाडून विराेध केला. भाजपच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.