अकोला: रस्त्याचे खोदकाम करताना जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाल्याचे चित्र मंगळवारी रयत हवेलीसमोर दिसून आले. दुसरीकडे शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम वेगात सुरू असतानाच जुने शहरातील शिवाजी नगर परिसरातील वाल्मीकी चौकात ‘एचडीपी’ पाइपचा जॉइंट उखडल्यामुळे डाबकी रोड भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. रस्ते असो वा जलवाहिनींच्या कामाला अकोलेकरांचा आक्षेप नसला तरी ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी रोखण्यासाठी मनपाकडून तातडीने उपाययोजना होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.शहरात सर्वत्र प्रशस्त रस्त्यांचे निर्माण केले जात आहे. त्यासाठी खोदकाम केले जात असतानाच जमिनीखालील जलवाहिन्या फुटण्याच्या प्रकारात वाढ झाल्याचे चित्र आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असून, जलवाहिन्यांची दुरुस्ती केली जात आहे. यादरम्यान जलवाहिनी लिकेज होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर मनपाच्या जलप्रदाय विभागाने त्या-त्या भागातील पाणी पुरवठा तातडीने खंडित करणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. महान धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तातडीने उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे.महान धरणात अवघा २८ टक्के जलसाठाशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात आज रोजी अवघा २८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. उन्हाची दाहकता वाढत असल्याने पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाला पाणी पुरवठ्याचे काटेकोरपणे नियोजन करावे लागणार असून, अक ोलेकरांनासुद्धा पाणी बचतीसाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.अकोलेकरांनो, पाणी शिळे होत नाही!महान धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता आगामी दिवसांत मनपाला पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करावा लागेल. अशावेळी दोन-दोन दिवस साठवून ठेवलेले पाणी शिळे झाल्याच्या भ्रामक समजुतीपायी अकोलेकर फेकून देतात. पाणी कधीही शिळे होत नसते, याबद्दल मनपाला जनजागृती करावी लागेल, हे निश्चित.गुडधीमध्ये फुटली जलवाहिनीमोठी उमरी ते गुडधीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. खोदकामादरम्यान विविध ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत आहेत. सोमवारी रात्री गुडधी परिसरात जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाल्याचे चित्र दिसून आले. या प्रकाराकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.