लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लग्न समारंभांमध्ये केवळ २५ व्यक्तींनाच उपस्थित राहता येणार असून, या उपस्थितीची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक करण्यात आले. कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्याप्रकरणी आतापर्यंत जिल्ह्यातील दाेन मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई केली. दरम्यान, लग्न साेहळ्यांवर आलेल्या बंधनामुळे साेहळे अडचणीत आले असून वऱ्हाडींची संख्या वाढविण्याची मागणी मंगल कायार्यालय संचालकांकडून हाेत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. लग्न समारंभ किंवा इतर छोट्या समारंभ, कार्यक्रमात २५ व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. २५पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय, सभागृह, लॉनचे चालक अथवा मालक, व्यवस्थापकांना १० हजार किंवा प्रतिव्यक्ती २०० रुपये यापैकी जी जास्त असेल त्या रकमेचा दंड आकारला जाईल. दुसऱ्यांदा अशी बाब आढळून आल्यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन १५ दिवसांसाठी सील केले जाणार आहे. लग्न समारंभ अथवा कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी गर्दी होणारी मिरवणूक काढता येणार नाही. तसे आढळल्यास नियमांनुसार गुन्हाही दाखल करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला. आयोजकांनी लग्नस्थळी किती लोक उपस्थित राहणार आहेत, याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. नगरपरिषद, पोलीस प्रशासनानेदेखील मंगल कार्यालय, लॉन, सभागृहांना भेटी देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार नगरपरिषद, पाेलिसांचे पथक मंगल कार्यालय, लॉन, सभागृहांना भेटी देत असून, जिल्ह्यात आतापर्यंत पाच मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मंगल कार्यालय, लॉन, सभागृह आदींचे मालक, चालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील एकूण मंगल कार्यालय, ५०
लॉन, सभागृह २२
कारवाई झाली ०२
दंड वसूल केला १० हजार
काेट
मंगल कार्यालय लाॅन्स यांची व्याप्ती लक्षात घेता लग्न साेहळ्यासाठी किमान दाेनशे लाेकांना परवानगी दिली पाहिजे २५ लाेकांसाठी काेणीही मंगल कार्यालय बुक करणार नाही. २५ लाेकांच्या उपस्थितीबाबतचा आदेश येण्यापूर्वी ज्यांनी बुकिंग केले हाेेते त्यांनी आता रद्द केले असून आम्ही सर्वांना आगाऊ रक्कम परत केली आहे.
दर्शन गाेयंका अध्यक्ष मंगल कार्यालय, लॉन्स असाे अकाेला
दोन सोहळ्यांवर कारवाई दहा हजारांचा दंड
लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त नागरिकांचा समावेश असल्याने रविवारी शहरातील विविध भागात सुरू असलेल्या दोन सोहळ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जठारपेठस्थित रत्लम लॉन्स येथे सुरू असलेल्या लग्न सोहळ्यास मनपाच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी पथकाला येथे ५०पेक्षा जास्त नागरिकांचा समावेश आढळून आल्याने पथकातर्फे पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुसरी कारवाई ही डाबकी रोडस्थित मनोरथ कॉलनी येथे सुरू असलेल्या लग्न सोहळ्यादरम्यान करण्यात आली. दोन्ही सोहळ्यांच्या आयोजकांकडून प्रत्येकी पाच हजार, असा दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.