जिल्ह्यात बुधवार, २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बसरला असून, चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे २२ जुलै रोजी जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून, अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेतातील पिके पाण्याखाली गेली. नदी व नाल्याकाठची शेतजमीन खरडून गेली असून, शेतात पावसाचे पाणी शिरल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे; परंतु नदी व नाल्यांना आलेला पूर ओसरत असला तरी, शेतांमध्ये साचलेले पावसाचे पाणी आणि रस्त्यांसह शेतांमध्ये चिखल असल्याने, पिकांचे पंचनामे करण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. पावसाने उघडीप दिल्यास दोन दिवसांनंतर शेतांमधील पीक नुकसानीचे पंचनामे करता येणार आहेत. त्यानुषंगाने पीक नुकसानीसह शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अद्याप पंचनामे सुरू करण्यात आले नाहीत. शेतात पावसाचे पाणी साचले असून, चिखल असल्याने पंचनामे करण्यासाठी शेताच्या नुकसानग्रस्त भागापर्यंत पोहोचता येत नाही. पावसाने उघडीप दिल्यास दोन दिवसांनंतर नुकसानग्रस्त भागापर्यंत पोहोचून पीक नुकसानीचे पंचनामे करता येतील.
शिवाजीराव भरणे
शेतकरी, रामगाव
अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांसह शेतजमीन नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्ह्यात शेतांमध्ये साचलेले पावसाचे पाणी कमी झाल्यानंतर आणि नुकसानग्रस्त शेतापर्यंत पोहोचणे शक्य असलेल्या शेतांमधील पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी