अकोला: फेब्रुवारी अखेरीस पश्चिम विदर्भातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, धरणांमधील जलसाठय़ाची पातळी वेगाने घसरत असल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही आताच ३७ अंशाच्या वर पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा धरणात केवळ १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील दगडपारवा व बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यावर्षी पश्चिम विदर्भातील मध्यम व मोठय़ा धरणांतील जलपातळी घसरली आहे. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने बोअरवेल, हातपंप, विहिरींना पाणीच उपलब्ध नसल्याने आतापासूनच महिला-पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांचे मोर्चे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा धरणात आजमितीस १४.६५ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. मोर्णा धरणात १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात केवळ ५.८४ टक्के पाणी उपलब्ध आहे. निगरुणा धरणात १७.२९ टक्के जलसाठा आहे, तर दगडपारवा धरण पूर्वीच शून्य टक्क्य़ावर आले आहे. अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान धरणात मात्र ५१.७२ टक्के पाणी उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात केवळ १२.३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, ज्ञानगंगा धरणात ३३.५९ टक्के, मस १४.७२ टक्के, कोराडी शून्य टक्के, पलढग १५.७१ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणाची टक्केवारी जवळपास १0.६८ असून, लोअर पूस ५२.४४ टक्के, सायखेडा २४.१0 टक्के, गोकी २९.३१ टक्के, वाघाडी ३२.८२ टक्के आणि बोरगाव धरणात १२.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम व अमरावती जिल्ह्यातील धरणांची स्थिती याचप्रमाणे आहे.
काटेपूर्णात अल्प जलसाठा काटेपूर्णा धरणात १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या पाण्याचा वापर जर काटेकोरपणे केला, तर जून-जुलैपर्यंंत हा जलसाठा वापरता येईल; परंतु यापुढे या शिल्लक असलेल्या पाण्याचे काटेकोर नियोजन करावेच लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी स्पष्ट केले. कोराडी, दगडपारवा शून्यावर अकोला जिल्ह्यातील दगडपारवा व बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी धरणाची पातळी शून्य टक्के असून, इतर धरणांतील पातळी वेगाने घसरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रकल्प १00 टक्के भरले होते. त्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा १0 टक्क्य़ांपर्यंत खाली आला आहे.