अकोला : विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच पाण्याचे महत्त्व रुजावे, जलजागृती निर्माण होऊन गावोगावी ‘जलदूत’ तयार व्हावेत, याकरिता पाठ्यक्रमात एक धडा समाविष्ट करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाने यासाठीचा पुढाकार घेतला असून, शासनही याबाबत अनुकूल असल्याने लवकरच हा धडा पाठ्यक्र मात समाविष्ट केला जाणार असल्याचे वृत्त आहे.राज्यात भूजल पातळीपासून ६० ते ६५ मीटर खोलपर्यंत मिळते. कोकणात सामान्यत: दोन मीटरवर पाणी लागते, विदर्भात तेच दोन ते पाच मीटरवर लागते तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये हेच पाणी ५ ते १० मीटरवर उपलब्ध होते. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात व उत्तरेस तापी व पूर्णा नदीच्या खोऱ्यात भूपृष्ठ पातळीच्या खाली २० मीटरपर्यंत पाणी लागते. अलीकडच्या काळात राज्याच्या बहुतांश भागात पाण्याची पातळी खाली आली आहे. अपर्याप्त पाऊस, घटलेले पुनर्भरण आणि भूजलाचा अतिउपसा यामुळे अशी स्थिती झाली आहे. नगर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, जालना, लातूर, नागपूर, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही भागात पावसाळा संपताच भूजल पातळी वेगाने खाली जात असल्याचे दिसून येते. हवामान बदलाचा प्रभाव जाणवू लागल्याने पाऊस अनिश्चित स्वरू पाचा झाला आहे. याच अनुषांगाने पाण्याच महत्त्व सांगण्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने राज्यात १६ ते २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या अख्त्यारीत एका गावातील शाळा दत्तक घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. हेच विद्यार्थी त्यांचे पालक प परिसरात पाण्याविषयी जलजागृती करतील.पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात जलजागृतीचा धडा समाविष्ट करण्यात येणार आहे. पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देणारा विषय राहील तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाणी बचत, आठवीच्या विद्यार्थ्यांना हवामान बदल, पावसाचे होणारे बदल आदी विषयांची माहिती देण्यात येईल.
जलजागृती विषयावर पाठ्यक्रमात धडा समाविष्ट करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पाण्याबाबतचे महत्त्व रुजविण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. जलजागृती सप्ताहातही जनजागृती करण्यात येत आहे.- अविनाश सुर्वे,कार्यकारी संचालक,विदर्भ सिंचन विकास मंडळ, नागपूर.