अकोला : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील खडकाळ माळरानावर श्रमदानाने जलसंवर्धनाचे काम करण्यात आले. जलसंवर्धनाचे हे एक मॉडेल आहे. शेतकऱ्यांनी या जलसंवर्धन कामाची पाहणी केल्यास, त्यांना त्यांच्या शेतावर या पद्धतीने जलसंवर्धनाची कामे करता येतील, असा विश्वास या वेळी या कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन १ मे रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात साजरा करण्यात आला. प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात झालेल्या मुख्य सोहळ्यात प्रभारी कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठातील सर्व सन्माननीय अधिष्ठाता, संचालक, सहयोगी अधिष्ठाता, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, विद्यापीठ अभियंता, नियंत्रक कुलसचिव, सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. विलास भाले, संचालक संशोधन डॉ. दिलीप मानकर, विद्यापीठ अभियंता रामदास खोडकुंभे, विद्यापीठ नियंत्रक विद्या पवार, कुलसचिव डॉ. श्रीकांत अहेरकर, मध्यवर्ती संशोधन केंद्राचे संचालक डॉ. सेठी, जलतज्ज्ञ डॉ. सुभाष टाले यांच्यासह सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, डॉ. प्रकाश नागरे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)स्वच्छता अभियानहीश्रमदान कार्यक्रमात सर्वच उपस्थितांनी सहभाग नोंदवत, कीटकशास्त्र विभागासमोरील तब्बल १६ हेक्टर क्षेत्रावरील सलग समतल चरांच्या निर्मितीसाठी काम केले. असंख्य हातांच्या श्रमदानाने माळरान फुलून गेले. महिलांची लक्षणीय उपस्थिती हे आजचे श्रमदानाचे वैशिष्ट्य होते. जवळपास दोन तास सर्वांनी श्रमदान करीत परिसराचा चेहरा मोहरा बदलला, सोबतच स्वच्छता अभियानसुद्धा राबविण्यात आले.
श्रमदानाने १६ हेक्टरवर जलसंवर्धन
By admin | Published: May 02, 2017 4:11 AM