नीलेश शहाकार/बुलडाणा पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, विदर्भ, कोकण व खान्देश आदी भागाच्या तुलनेत राज्याच्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात पाणी टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तसेच भूजल सर्वेक्षण विभाग यांनी २६ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, राज्यात २२९४ खासगी व शासकीय टँकरने णीपुरवठा केला जात असून, यात मराठवाड्यात १६४0 आणि पश्चिम भागात ४४५ टँकर आहेत. सद्यस्थितीत राज्यातील २0 जिल्ह्यांवर जलसंकट आहे.गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या अल्प पावसाने राज्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यात ३ हजार ७८४ गावे व वाड्या वस्त्यांवर राज्यभरात तब्बल २ हजार ९६ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. सद्यस्थितीत राज्यातील २0 जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. या जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरचा आधार आहे. उर्वरित १४ जिल्ह्यांत फेब्रुवारीअखेर टँकर सुरू झाले नाहीत. पाणीटंचाई असलेले सर्वाधिक जिल्हे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. गेल्या वर्षभर राज्यातील काही जिल्ह्यांत बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे गतवर्षी २२ फेब्रुवारी २0१५ च्या अहवालानुसार, यंदा पाणीटंचाई जाणवत असलेल्या या जिल्ह्यांमध्ये पाणी टँकरची आवश्यकता भासली नव्हती.टँकरवरच भागविली जाते तहान!सर्वाधिक टँकर बीड जिल्ह्यात सुरू असून, २९६ गावे व २५२ वाड्या-वस्त्यांना ३९0 खासगी व शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या पाठोपाठ औरंगाबाद ३३८ पाणी टँकर सुरू असून, नांदेड २४३, उस्मानाबाद २४१, अहमदनगर २0९, जालना १७0, लातूरला १६६ पाणी टँकरचा आधार आहे. तसेच सांगली ७८, नाशिक ५५, पुणे ५३, जळगाव १३, धुळे २, सातारा २५, सोलापूर १0, परभणी ८३, हिंगोली ९ या जिल्ह्यांसह विदर्भातील अमरावती जिल्ह्यात १, वाशिम २, बुलडाणा ७, यवतमाळ १, अशा एकूण २0 जिल्ह्यांतील नागरिकांची तहान टँकरच्या पाण्याद्वारे भागविली जात आहे.११ जिल्हे टँकरमुक्त!ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या चौदा जिल्ह्यांत फेब्रुवारीअखेरपर्यंत टँकर सुरू झाले नसल्याची नोंद आहे.
२0 जिल्ह्यांवर जलसंकट
By admin | Published: March 02, 2016 2:38 AM