लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाणी बहुमोल असून, पाण्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. भविष्यात येणार्या पिढीसाठी पाण्याचे जतन करावे लागणार आहे, अन्यथा पाण्यासाठी युद्धाला सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादन श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अरू ण शेळके यांनी शनिवारी येथे केले.अकोल्यात इंडियन वॉटर वर्क (आयवा)असोसिएशनची ३३ वी शाखा स्थापन करण्यात आली. त्यानिमित्त बाभूळगाव येथील श्री.शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरू न बोलत होते. कार्यक्रमाला श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, आयवाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गुप्ता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे तांत्रिक संचालक डॉ. हेमंत लांडगे, श्री. शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के. देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता एस.बॅनर्जी, मजीप्राचे कार्यकारी अभियंता विवेक सोळंके अकोला, अजय मालोकार आदींची उपस्थिती होती. अँड. शेळके यांनी पाण्याचे महत्त्व समजावून सांगताना, इंडियन वॉटर वर्क असोसिएशनची अकोला येथे शाखा स्थापन झाल्याने, या भागातील जनतेला पाण्यासंबंधी या संस्थेला लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तद्वतच या संस्थेच्या अभियंत्यांनी नवे संशोधन करू न नागरिकांना स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा करावा, तसेच तंत्रज्ञान समजावून सांगावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली. डॉ. गुप्ता यांनीही पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले. डॉ.लांडगे यांनी शाश्वत पाण्याच्या स्रोतावर विचार मांडले. भविष्यातील पिढीची गरज ओळखून आतापासूनच आपण पाण्याचा काटेकोर वापर करणे अनिवार्य असल्याचे ते म्हणाले. ५0 वर्षे आधी नदी, नाले तुडुंब भरलेले असायचे. बारमाही पाण्याची उपलब्धता होती. आज त्याच नदी, नाल्यांची गटारे झाली आहेत. हाच वारसा आजच्या आपल्या पिढीपुढे आहे. आपणही तोच वारसा भविष्यात ठेवायचा का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, येथे पाणी या विषयावर उपस्थित तज्ज्ञांनी पडद्यावर सादरीकरण केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र व इतर राज्यातील तज्ज्ञांची उपस्थिती होती. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
पाणी संवर्धनच तारणार - शेळके
By admin | Published: July 09, 2017 9:29 AM