ग्रामस्थांचा श्रमदानासाठी पुढाकार
पातूर : पावसाच्या पाण्याचे संचयन शास्त्रीय पद्धतीने व्हावे, या उदात्त हेतूने अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्यावतीने वॉटर कप राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत ८ एप्रिलपासून सुरुवात झाली असून, यामध्ये पातूर तालुक्यातील ग्रामस्थ श्रमदान करण्यासाठी पुढाकार घेत असून, जलसंधारणाच्या कामांना वेग आला आहे. पातूर तालुक्यातील ३५ गावांनी सहभाग घेतला आहे. यापैकी २० गावांमध्ये पहिल्याच दिवशी श्रमदान करण्यात आले. शिर्ला गावात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, आमदार बळीराम सिरस्कार आदींनी प्रत्यक्ष श्रमदान करून स्पर्धेचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे, शिर्ला येथे युवकांनी रात्री १२ वाजून १ मिनिटाने श्रमदानास प्रारंभ केला. पातूर तालुक्यातील चारमोळी येथील ८०० ग्रामस्थांनी एकाच वेळी कामे करण्यात आली. पुढील ४५ दिवसांत श्रमदानातून शिर्ला गावाचा कायमचा दुष्काळ दूर करा, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शिर्ला येथे केले. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सलग दोन तास कंटुर बांध, माती भराव घालून अठरा घनमीटरपेक्षा अधिक काम केले. आमदार बळीराम सिरस्कार यांनी दगडी बांध घालून जमिनीत पाणी मुरविण्याची क्षमता वाढविली. शिर्ल्यात झालेल्या महाश्रमदानातून दोन हजार मीटरचे काम साकारल्या गेले. तालुक्यातील शिर्ला येथे ढाळीचे बांध, चारमोळी येथे कंटूर बांध, अंधार सावंगी,मळसुर, पांगरताटी, सुकळी, जांभरून, गोंधळवाडी, चिंचखेड, भंडारज, बेलुरा बु.,बेलुरा खुर्द, राहेर, शेकापूर, सस्ती आदी गावांमध्ये पहिल्याच दिवशी कामाला सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील ३५ गावातील ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे श्रमदान करीत असल्याने जलसंधारणाच्या कामांना वेग आला आहे. चारमोळी गावाचा उच्चांकसलग तीन दिवसात चारमोळी गावाने ५ मीटर लांब, ०.३० खोल व ०.६० रुंदीच्या १२५ सीसीटी ग्रामस्थांनी श्रमदानातून साकारला. त्यांची वार्षिक पाणी साठवणुकीची क्षमता २२ लाख ५० हजार लिटर आहे. चारमोळी गावातील ग्रामस्थांनी १५ हेक्टरच्या शिवारात कंटुर व कंपार्टमेंट बंडिंगची कामे करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी दोन हेक्टरमध्ये कंटुर बांधांचे काम पूर्ण झाले आहे. वॉटर कप मिळो अथवा न मिळो, ग्रामस्थ एकत्र येऊन श्रमदान करीत आहेत, हे गावासाठी मोठी आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ देतात. हाच उत्साह ४५ दिवस कायम ठेवण्याचा निर्धार या गावातील ग्रामस्थांनी केला आहे.श्रमदानादरम्यान भावनिक चित्र वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावांमध्ये गेल्या तीन दिवसांत वेगवेगळे चित्र पहायला मिळत आहे. कुठे श्रमदान करून विसावा घेत असलेली माय माउली व त्यांची मुले तर कुठे मित्रांची तहान भागविण्यासाठी स्वत: पाणी पाजणारे आजोबा, तर कुठे आपल्या छोट्या हातांनी दगडी बंधारा करणारे लहान मुले, कुठे महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग, तर कुठे कृषी सहायक, ग्रामसेवक, सरपंच यांनी हातात हात घेऊन केलेले श्रमदान,असे भावनिक चित्र या श्रमदानादरम्यान आढळत आहे.