अकोला : पश्चिम विदर्भातील धरणांमधील जलसाठय़ात झपाट्याने घट होत आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा धरणात केवळ २२ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येणार्या दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे एकंदर चित्र आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरविल्याने येथील धरणांमध्ये अल्प जलसाठा शिल्लक आहे. यावर्षी हिवाळा लागला, पण थंडीला प्रत्यक्षात एक ते दीड महिन्यांनी सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात तापमानात प्रचंड वाढ झाल्याने जलसाठय़ातील पाण्याचे बाष्पीभवन झाले. डिसेंबरच्या शेवटच्या आणि जानेवारीच्या प्रथम आठवड्यात थंडीला सुरुवात झाली. जानेवरीत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग काहीसा कमी झाला होता.आता पुन्हा रात्री थंडी आणि दिवसाच्या तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढत आहे. दरम्यान, काटेपूर्णा या मोठय़ा प्रकल्पात आजमितीस केवळ २२ दलघमी म्हणजे २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या जिवंत जलसाठय़ात आठ ते दहा टक्के गाळ असल्याने शहरापुढे पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. बुलडाणा जिलतील नळगंगा धरणामध्ये २९.१0 दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिलतील ज्ञानगंगा प्रकल्पात ५९ टक्के, मस धरणामध्ये ७४ टक्के, कोराडी ५0 टक्के, पलढग या प्रकल्पात ७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिलतील मोर्णा धरणात ३५ टक्के, निर्गुणा ६६ टक्के, उमा धरणात १४ टक्के जलसाठा शिल्लक असून, दगडपारवा धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अंभियता विजय लोळे यांनी काटेपूर्णा धरणातून शहर आणि विविध पाणीपुरवठा योजनांना प्रत्येक महिन्याला तीन दशलक्ष घनमीटर पाणी सोडले जात असल्याचे सांगून त्यानुसार येत्या सहा महिन्यांत १८ दलघमी पाणी लागेल. धरणात आजमितीस २२ दलघमी पाणी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसली तरी काटकसर व काटेकोर नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.
व-हाडातील धरणांचा जलसाठा घसरला!
By admin | Published: February 03, 2015 12:08 AM