- राजरत्न सिरसाटअकोला: एप्रिलअखेर जिल्ह्यातील शेकडो गावात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणातील जिवंत जलसाठ्यात मागील तीन आठवड्यांत २.५ टक्क्यांनी घट झाली. आजमितीस या धरणात केवळ ५.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. या पाण्यात आठ लाख अकोलेकरांची तहान भागणार कशी, असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे. दुसरीकडे पाणी पुरवठ्याची कोणतीच सोय नसल्याने शहरातील नागरिकांनी मोर्चे, आंदोलनाला सुरुवात केली. महिलांनी तर लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर लोटांगण आंदोलन करू न पाणी प्रश्न सोडविण्यासाठी साकडे घातले.अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा हे एकमेव मोठे धरण असून, या धरणाच्या पाण्यावर आठ लाख अकोलेकरांची तहान भागविली जाते; पण मागील वर्षी पूरक पाऊस न झाल्याने या धरणात अल्प जलसाठा संचयित झाला. परिणामी, यावर्षी पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले. धरणांतील जलसाठ्याची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही ४३ ते ४४ अंशांपर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे.दरम्यान,जानेवारी महिन्याच्या शेवटी काटेपूर्णा धरणात १२.८४ टक्के जलसाठा उपलब्ध होता. फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यात मात्र हा जलसाठा १०.५८ टक्के खाली आला. म्हणजे १० ते १२ दिवसांत दोन टक्केपर्यंत घट झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीला या धरणात नऊ टक्के जलसाठा शिल्लक होता, तर एप्रिल महिन्याच्या १२ एप्रिल रोजी हा जलसाठा ७.३४ टक्केपर्यंत घटला. २४ एप्रिल रोजी मात्र या धरणात ५.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. म्हणजेच बारा दिवसांत या जलसाठ्यात २.३५ टक्के घट झाली. ही घट याच वेगाने सुरू राहिल्यास या धरणातील जिवंत जलसाठा जुलैपर्यंत पुरणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
- मृत जलसाठा ११ दलघमी!या धरणात ११ दशलक्ष घनमीटर मृत जलसाठा असल्याचे सांगण्यात येत असले, तरी अर्ध्यापेक्षा जास्त त्यामध्ये गाळ आहे. त्यामुळे गाळातील पाणी जुलै महिना भागवेल, याबाबतही साशंकता आहे.
- मृतसाठा उपसणार कसा?पाणीटंचाईची भीषणता वाढली असून, जिवंत जलसाठा काही दिवसांचा शिल्लक असताना मृत जलसाठा उपसण्यासाठीची कोणती तयारी प्रशासनाने केली, असा प्रश्न अकोलेकरांकडून उपस्थित केला जात आहे.