- आशिष गावंडे
अकोला : अकोलेकरांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत असला, तरी पाण्याची किंमत समजत नसल्यामुळे की काय, हातात पाइप घेऊन रस्त्यांवर पाणी शिंपडणारे, चारचाकी, दुचाकी वाहने धुणाऱ्यांची संख्या कमी होण्याचे नावच घेत नसल्याचे चित्र आहे. महान धरणात आजरोजी अवघा नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली असताना पाण्याची होणारी नासाडी चिंतेचा विषय झाला आहे. ही बाब लक्षात घेता मनपा प्रशासनाने जनजागृतीसाठी पुढाकार घेतला असला, तरी शहरातील सामाजिक, स्वयंसेवी संघटनांनी ‘जल’जागृतीसाठी समोर येण्याची गरज निर्माण झाली आहे.गतवर्षी पावसाने हुलावणी दिल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणातील (काटेपूर्णा प्रकल्प) जलसाठ्यात घसरण झाली आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अखेरच्या काही दिवसांत आलेल्या पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात अवघ्या एक ते दीड टक्क्याने वाढ झाली. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करून शहरवासीयांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. नळाला आठ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याची पुरेपूर जाणीव असतानादेखील नागरिकांना पाण्याचे महत्त्व समजले नसल्याचे चित्र पहावयास मिळते. पाणी पुरवठा करताना त्या-त्या भागातील पाइपलाइनवरील शेवटच्या नळ कनेक्शनधारकांना पाणी पुरवठा करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. पाइपलाइनवरील शेवटच्या नळ कनेक्शनधारकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी लागणाºया कालावधीचा गैरफायदा घेत नागरिक पाण्याची नासाडी करीत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येते. घरासमोरील रस्त्यावर पाणी शिंपडणे, चारचाकी, दुचाकी वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर केला जात आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता मनपा प्रशासनाने ‘जल’जागृतीसाठी शहरात फ्लेक्स, होर्डिंग उभारले असले, तरी नागरिकांनीच पाण्याचा जपून वापर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव!यंदा महान धरणात ठणठणाट होणार असल्याची परिस्थिती आहे. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे जलसाठ्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाच्या मदतीने धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव तयार केला. सदर प्रस्ताव जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सादर केल्याची माहिती आहे.