बार्शिटाकळी : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत समृद्ध गाव स्पर्धेत रूपांतर झाले असून यामध्ये अकोला जिल्ह्यातून अकोट व बार्शीटाकळी तालुक्याची निवड करण्यात आली आहे. यापैकी बार्शीटाकळी तालुक्यामध्ये ४१ गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून सहभागी गावातील ग्रामस्थ व वॉटर हिरो या स्पर्धेत टिकण्यासाठी ५ मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत जागून विविध उपायांबाबतची माहिती ऑनलाईन करण्यासाठी एकत्रित आले. या स्पर्धेत पात्र होण्यासाठी ५ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत १२० गुणांची माहिती ॲपमध्ये भरणे अनिवार्य असल्याने प्रत्येक गावाचे ग्रामस्थ आपण स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ठरवून दिलेल्या गुणांची माहिती अपलोड करण्यात गेल्या आठवड्यापासून मग्न होते. ज्या गावांनी ही माहिती परिपूर्ण भरली तीच गावे या स्पर्धेत पात्र होणार आहेत. प्रशासनाचे कर्मचाऱ्यांनीसुद्धा जागरण केले. समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी बार्शिटाकळी तालुक्यातील ४१ गावांच्या वॉटर हिरो व ग्रामस्थांना आपल्या गावाची खरीप, रब्बी हंगामातील पिकांची माहिती, शेतातील विहिरी व बोअरवेल बाबत सर्वेक्षण करण्यासाठी परिपूर्ण माहिती ॲपमध्ये नोंदविण्यासाठी अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार गजानन हामंद, तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शनात तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आदी शासकीय कर्मचाऱ्यांनी गावात येऊन गाव समृद्ध करण्यासाठी सहकार्य केले. प्रशासनाची ग्रामस्थांना साथ मिळत असून तालुका समन्वयक संघपाल वाहुरवाघ, विद्याताई आकोडे हे पाणी फाउंडेशनच्या वतीने काम पाहत आहेत. स्पर्धेत जास्तीत जास्त गावांनी सहभाग घेऊन आपले गाव समृद्ध करण्यासाठी तसेच जलव्यवस्थापन, गावकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, मृदा आणि जलसंधारण, संरक्षित कुरण क्षेत्र तयार करणे, वृक्ष आणि जंगले वाढविणे, माती पुनरुज्जीवित करणे आधी उपायांवर भर देऊन वॉटर हिरो व ग्रामस्थांनी लोक चळवळ यशस्वी करावी असे आवाहन पाणी फाउंडेशनचे विदर्भाचे मास्टर ट्रेनर सुमित गोरले यांनी केले.
फोटो: