मतदार यादी पुनरीक्षण मोहीम
अकोला : जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण विशेष मोहीम ५ व ६ डिसेंबर, १२ व १३ डिसेंबर रोजी निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे इत्यादी करिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे आवश्यक फॉर्म भरून देण्यात यावे. मतदार यादीतील दुबार, स्थलांतरित, मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाहीसुद्धा या मोहिमेत होणार आहे. तरी अकोला जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करावा
अकोला : वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने कीर्तन, नामस्मरण करण्याची परवानगी अटी व शर्तीवर देण्यात यावी, अशी मागणी श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सर्वत्र व्यवहार सुरू झाल्यानंतरसुद्धा केवळ कीर्तनकार, प्रवचनकार गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांच्या उपजीविकेवर तसेच धर्मकार्यावर पूर्णपणे परिणाम झाला आहे. राजकीय पक्षांच्या सभा होत असताना, आंदोलने होत असताना आमच्यावर अन्याय का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे