धाबा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत राजनखेड शिवारात भूमापन क्र. ११ चे पोटखराबा क्षेत्र ०.४० हेक्टर, भूमापन क्र. ८ चे ३.४४ हेक्टर, भूमापन क्र. १ चे १.४७ हेक्टर क्षेत्र ईक्लास झाला आहे. भूमापन क्र. ५ चे क्षेत्र ७.७९ हेक्टर हे वनविभागाचे आहे. या क्षेत्रामध्ये सामाजिक वनीकरण विभागाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आहे. या वृक्षांचे संगोपन सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात येते. या वृक्षांना पाणी देण्यासाठी टँकरऐवजी विहिरीमध्ये मोटारपंप बसवून आणि त्यासाठी रीतसर विद्युत कनेक्शन न घेता, विद्युत खांबावर आकडा टाकून वीज चोरी करून वृक्षांना पाइपलाइनद्वारे पाणी देण्यात येत आहे. राजनखेड गाव व तांड्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतच्या दोन विहिरींपैकी एका विहिरीत मोटारपंप टाकून व विजेची चोरी करून वृक्षांना पाणी देण्यात येत आहे.
एका तासात पाइपलाइन काढून प्रकरण सावरण्याचा प्रयत्न
वीज चोरी करून वृक्षांना पाणी देण्याचा सामाजिक वनीकरण विभागाचा प्रताप समोर आल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका तासात टाकलेली पाइपलाइन काढून घेतली. एवढेच नाहीतर, वीज खांबावरील आकडासुद्धा काढण्यात आला. हे प्रकरण सावरण्यासाठी संबंधित विभागाने आटोकाट प्रयत्न केले.
पाणी देण्यासाठी खोटी देयके काढण्याचा प्रयत्न
वृक्षांना पाणी देण्यासाठी टँकर किंवा मजुरांचा वापर करून खोटी देयके काढण्याचा प्रयत्न यामागे असावा, अशी चर्चा या वेळी आहे. विद्युत खांबावर आकडा टाकून वीज चोरी करून पाइपलाइनद्वारे वृक्षांना पाणी देण्याचा प्रयोग सुरू होता. कागदोपत्री टँकर व मजुरांद्वारे पाणी देण्यात येत असल्याचे भासवून त्याची देयके काढण्याचा प्रकार तर यामागे नसावा अशी शंका उपस्थित होत आहे. या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी डांगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.
झालेला प्रकार गंभीर आहे. या प्रकाराबाबत संबंधितांकडून माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल. त्यानंतर योग्य कारवाई करण्यात येईल.
- विजय माने, उपविभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण
ग्रामपंचायतला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन विहिरी आहेत. सामाजिक वनीकरण विभागाला पाणी देण्यासाठी ठराव घेतला नाही तसेच लेखी मंजुरीसुद्धा दिली नाही.
- मनोज गवई, ग्रामसेवक राजनखेड