अकोला : शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या मोर्णा नदी पात्रातील अकोली ते गंडकी रेल्वे पुलापर्यंतची जलकुंभी काढण्याचे काम २३ मे रोजी पूर्ण झाले आहे. जलकुंभीच्या नायनाटामुळे मोर्णा मायने मोकळा श्वास घेतला, पण मोर्णा नदीमध्ये शहरातून दररोज सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचे काय? या घाण सांडपाण्यामुळे नदीचे जलप्रदूषण वाढले आहे. महापालिकेने जलकुंभी काढण्यासोबतच मोर्णा नदीत सोडले जाणाऱ्या सांडपाण्याला रोखावे, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
मोर्णा नदीत मोठ्या प्रमाणात जलकुंभी झाल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव होऊन शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशानुसार व मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आणि जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा यांच्या देखरेखीत मोर्णा नदीतील जलकुंभी काढण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता. महानगरपालिका क्षेत्रातील अकोली, सिंधी कॅम्प, निमवाडी, कमला नेहरू नगर, अनिकट, सावतराम चाल, खोलेश्वर, मुख्य गणेश घाट, राम नगर, दगडी पूल, गुलजार पुरा, मासूमशाह कब्रस्तान, रमाबाई नगर, आरपीटीएस रोड ते रेल्वे पुलापर्यंतच्या नदीतील एकूण ४.३ किलोमीटर पदीपात्रातील जलकुंभी काढण्याचे काम २३ मे रोजी पूर्ण झाले आहे.
महापालिकेने मोर्णा नदीतील स्वच्छता व जलकुंभी काढण्याचे कौतुकास्पद काम केले असले, तरी केवळ जलकुंभी काढून समस्या सुटणार नाही. मोर्णा नदी ही अकोला शहराची जलवाहिनी बनली पाहिजे. या दृष्टीकोनातून महापालिका प्रशासनाने नदीत दररोज साेडण्यात येणारे सांडपाणी रोखून सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नदी स्वच्छतेची जबाबदारी निरीक्षकांवरमोर्णा नदीत पुन्हा नवीन जलकुंभी आढळून आल्यास ती तातडीने काढणे आणि नदी पात्रात किंवा नदी काठी निर्माल्य किंवा कचरा टाकणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी ज्या स्वच्छता निरीक्षकाच्या कार्यक्षेत्रात जे नदीचे पात्र येईल ते संपूर्णपणे स्वच्छ ठेवण्याचे काम संबंधित स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.