अकोटः वान धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी टाकलेल्या जलवाहिनीच्या गळतीवरून चार लाखांचे पाणीचोरी केल्याची तक्रार पाणीपुरवठा उपविभागीय अधिकाऱ्यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये शनिवार, दि. १५ मे रोजी दाखल केली.
पाणीपुरवठा उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वान धरण-अकोट शहरादरम्यान, जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीवरील जोडणी शेतमालक सुनील रामकृष्ण राऊत (रा. हिवरखेड) यांनी नादुरुस्त करून जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान केले. जलवाहिनीच्या जोडणीजवळ खड्डा करून पाणी स्वत:च्या विहिरीत घेत आहेत. शेतकरी वारंवार जोडणी निकामी करून भरपूर प्रमाणात शासनाचे पाणी चोरी करीत आहे. आतापर्यंत सदर शेतकऱ्याने चार लाख रुपयांचे पाणी चोरले असून, फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी जलवाहिनीमधून अवैध कनेक्शन घेण्यात आले आहेत. या अवैध कनेक्शनमुळे नियमित पाणी देयक भरणाऱ्या ग्राहकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.