लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : पूर्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने गोपालखेड पाणी पुरवठा योजना गेल्या काही दिवसांपासून बंदच पडली होती. त्यामुळे या योजनेद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या धामणासह इतर गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. या गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणी पुरवठा होत असला, तरी लोकसंख्येच्या तुलनेत तोकडा पडत होता. याविषयी लोकमतने वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागाने घुंगशी बॅरेजमधून पाणी सोडले आहे. त्यामुळे, पूर्णा नदीचे पात्र वाहू लागले असून, नदीकाठावरील गावांसह इतर गावांना पाणीटंचाईतून दिलासा मिळाला आहे. यावर्षी अल्प पाऊस झाल्याने जलप्रकल्पांनी तळ गाठला आहे. परिसरातील गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पूर्णा नदीचे पात्रही हिवाळ्य़ातच कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे संकट वाढले होते; तसेच गांधीग्राम, गोपालखेड, निराट, वैराट, राजापूर, धामणा, नवीन धामणा येथे पाणी पुरवठा करण्यात येणारी गोपालखेड योजनाही बंद पडली होती, त्यामुळे या गावांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा सुरू करावा लागला होता. पाटबंधारे विभागाने घुंगशी बॅरेजमधून पाणी सोडल्याने पूर्णा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. सध्या नदीच्या पात्रात पाच ते सहा फूट पाणी असल्याने नदीकाठावरील गावांना दिलासा मिळाला आहे, तसेच पूर्णा नदीवरून बागायती शेती करणार्या शेतकर्यांच्या गहू, हरभरा, कपाशी ,तूर या पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे. पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णा नदीत पाणी आल्याने मिटला आहे. पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात आणि आमदार रणधीर सावरकर यांच्यासह सरपंच उज्जवला मोहन भांबेरे यांनी पाठपुरावा केला.
गोपालखेड योजनेसह इतर गावातील पाणी प्रश्न बिकट झाला होता, तसेच पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनीसुद्धा केली होती. परिसरातील गावातील पाणी समस्या लक्षात घेता घुंगशी बॅरेजमधून पाणी सोडण्यात आले. - मनोज बोंडे, कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.