वरुर जऊळका (जि. अकोला), दि. ५- पुलाचे बांधकाम करीत असताना जीवन प्राधिकरणच्या पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन फुटल्याने हजारो गॅलन पाण्याची नासाडी होत आहे. चार दिवसांपासून पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने वरुर जऊळका व परिसरातील लोतखेड, खापरवाडी, कालवाडी आदी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून पिण्यासाठी पाणी म्हणून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे; मात्र संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्षच असल्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.वरुर जऊळका येथील पठार नदीवर मोठा पूल बांधण्याचे काम नुकतेच सुरू झाले असून या नदीलगतच किनार्यावर जीवन प्राधिकरण विभागाची जलवाहिनी गेलेली आहे. पुलाच्या कामासाठी जेसीबीद्वारे काम सुरू असून या जेसीबीने सदर जलवाहिनी फुटल्याने हजारो गॅलन पाणी वाया गेले आहे. यामुळे ग्रामस्थांना गोड पाणी मिळणे कठीण झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सदर जलवाहिनी फुटलेली असून जलवाहिनी अद्याप जोडलेली नाही. पिण्याकरिता पाणी हवे म्हणून नागरिक विहिरीचा सहारा घेत आहेत. तर या विहिरीचे पाणी क्षारयुक्त असल्यामुळे पाणी पिणेसुद्धा अवघड झालेले आहे. सकाळपासून मजुरीचे काम दूर ठेवून मजूर वर्गाला आधी पाण्यासाठी विहिरीचा आधार घ्यावा लागतो. विहिरीवर नियमितच मोठय़ा प्रमाणात गर्दी पाहावयाला मिळत आहे. उन्हाळा सुरू झाला असून लग्नाचा मोसमसुद्ध सुरू झाला आहे.अकोला जि.प.चे अध्यक्ष यांचा हा मतदारसंघ आहे. अकोट पं.स. उपसभापतीसुद्धा स्थानिक गावचे आहेत. यांनी सदर भाग खारपाणपट्टय़ाचा असल्यामुळे याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या चार दिवसांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी त्रस्त व्हावे लागत आहे; मात्र अधिकारी वर्गाचे याकडे दुर्लक्ष दिसून आहे. तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
जलवाहिनी फुटली; पाण्याची नासाडी
By admin | Published: March 06, 2017 2:00 AM