मूर्तिजापूर: तालुक्यातील खारपाण पट्ट्यातील लाखपुरीसह १७ गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यासाठी जि.प. सदस्य अप्पू तिडके यांनी पाणीपुरवठामंत्र्यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे. निवेदनातून लाखपुरी १७ गाव स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अस्तित्वात येण्यासाठी त्वरित मंजुरात द्यावी, यासाठी अधीक्षक अभियंत्यांना आदेशित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील लाखपुरीसह सांगवी, दुर्गवाडा, घुंगशी, मुंगशी, विरवाडा, भटोरी, पारद, सांगावा मेळ, दताळा, शेलूबोंडे, लाईत, दातवी, वाघजळी, मंगरुळकांबे, जांभा बु., रेपाडखेड, रसुलपूर या गावांतील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता, या १८ गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्याबाबत अधीक्षक अभियंत्यांना आदेशित करावे व तातडीने योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीने सबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावे, अशी मागणी जि. प. सदस्य अप्पू तिडके यांनी केली आहे. यावर पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना गोडे पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करून लवकर समस्या मार्गी लावल्या जाणार, असे आश्वासन दिल्याचे अप्पू तिडके यांनी सांगितले आहे.