लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होण्यास कारणीभूत ठरलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीला प्रशासनाने चांगलाच दणका दिला. जलवाहिनीच्या दुरुस्तीपोटी आठ लाख रुपये व पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी चार लाख, असा एकूण १२ लाख रुपयांचा दंड त्वरित मनपात भरणा करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी कंपनीला दिले आहेत. शुक्रवारी खडकी परिसरातील श्रद्धानगर येथे कंपनीच्या खोदकामात मनपाची ९00 व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे ऐन जलसंकटाच्या परिस्थितीत लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला. महापालिकेने जलवाहिनी दुरुस्तीचे काम रविवारी पूर्ण केले. सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत केल्यानंतर मनपाने रिलायन्स कंपनीच्या विरोधात कारवाईचा दांडूका उगारला. ९00 व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडणार्या कंत्राटदार स्वामी टेलीनेट अँन्ड कन्स्ट्रक्शन कंपनी, धुळे यांना १२ लाखांचा दंड आकारण्यात आला. यामध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी आठ लाख रुपये आणि शुद्ध पाण्याचा अपव्यय झाल्यामुळे ४ लाख रुपये दंडात्मक रकमेचा समावेश आहे. कंपनीने सदर रकमेचा भरणा करावा; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी दिला आहे.
कंपनीच्या तोंडचे पाणी पळाले!महापालिकेने दंडात्मक कारवाईचे हत्यार उपसताच कंपनीच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ९00 व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्यामुळे मनपाने दंड आकारला. ही रक्कम कमी व्हावी, यासाठी कंपनीचे काही प्रतिनिधी मनपाकडे ‘सेटिंग’ लावत असल्याची माहिती आहे.