- संतोष गव्हाळे
हातरुण: बाळापूर तालुक्यातील हातरुण परिसर खारपाणपट्ट्यात येत असून अनेक गावात "एप्रिल हिट" मुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शासकीय उदासीनतेमुळे आणि प्रशासकीय नियोजनाअभावी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नदी-नाल्यात पाण्याचा ठणठणाट असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचा मुहूर्त कधी निघतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.हातरुण परिसरातील १० गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. या गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र उपाययोजना करण्यात न आल्याने एप्रिल हिट च्या कडक उन्हात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू आहे. मागील वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी झाली. बोअरवेल कोरड्या पडल्या असून हातरुण, मालवाडा, लोणाग्रा, हातला, शिंगोली, मांजरी, अंदुरा, नया अंदुरा, कारंजा रमजानपूर, निंबा गावांना ऐन उन्हाळ्यात नैसर्गिक व कृत्रिम पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या गावातील नागरिकांना पहाटेपासूनच सर्व कामे धंदे मोलमजुरी सोडून दिवसभर पाण्याच्या शोधात शेत शिवारात गाव शिवारात भटकंती करावी लागत आहे.शिंगोली, मालवाडा, लोनाग्रा, हातला गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाला कायमस्वरूपी व शाश्वत पाणी पुरवठा करणारे स्त्रोत नसल्यामुळे तसेच या वर्षी अत्यंत अल्प प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे जमिनीची भुजल पातळी खालावली आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. कारंजा रमजानपूर पाणीपुरवठा योजनेचे पाच बोअरवेल आटल्याने या योजनेअंतर्गत येणाऱ्या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी भरावे की मजुरीला जावे? असा प्रश्न मजुरांसमोर पडत आहे. पाणी आणण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. तर काही नागरिकांना सायकल, मोटारसायकल, डोक्यावर पाणी आणावे लागत आहे.पाणी टंचाईमुळे पशुपालक अडचणीत सापडले असून आपल्या पशुधनाच्या पिण्याच्या पाण्यासाठी शिवारामध्ये पशु पालकांना भटकंती करावी लागत आहे. पाणी टंचाईमुळे पशुपालक आपल्या पशुधनाची कवडीमोल भावामध्ये बाजारात विक्री करताना दिसून येत आहेत. प्रशासनाने गावागावात बोअरवेल करण्यासाठी निधी उपलब्ध करून कायमस्वरुपी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधुन केली जात आहे.हातरुण येथे लाखो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर दोन जलकुंभ बांधण्यात आले. मात्र यातील मोठ्या जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने हा जलकुंभ पांढरा हत्ती ठरला आहे. गेल्या दोन वर्षापासून कारंजा रमजानपूर पाणीपुरवठा योजनेचे पाणी हातरुण ग्रामस्थांना पिण्यासाठी मिळाले नाही. हातरुण येथे दोन बोअरवेल असून त्यातील एका बोअरवेलचे पाणी आटल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कृती आराखडा अंतर्गत हातरुण येथे बोअरवेल व पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी साठी निधी देण्याची मागणी सरपंच संजीदा खातून एजाज खान यांनी केली आहे.
मोर्णा नदी आटली!
वातावरणातील बदलांमुळे एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट आली आहे. कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांना उकाडा आता असह्य होत आहे. ग्रामीण भागातही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम होता. हातरुण येथून वाहणारी मोर्णा नदी आटल्याने नदी पात्रात पाण्याचा ठणठणाट आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जळवाहिनीवर असलेल्या एअर व्हाल मधून गळणाऱ्या पाण्यावर जनावरे तहान भागवतात. नदी आटल्याने जनावरांना पाणी पाजावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.शिंगोली गावात भीषण पाणीटंचाई
शिंगोली गावात गेल्या काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कारंजा रमजानपूर पाणी पुरवठा योजनेचे पाणी नियमित मिळत नसल्याने नागरिकांना शेतातून दुरवरून पाणी आणावे लागते. गावातील नागरिक बैलगाडीने पाणी आणतांना उन्हाच्या वेळी दिसून येतात. पाणी टंचाईवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी प्रवीण बोर्डे, सुधाकर बोर्डे, संदीप बोर्डे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. जल पातळीत वाढ करण्यासाठी उपाययोजना कधी?
सूर्य आग ओकू लागल्याने या उन्हाच्या तडाख्यात पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. दरवर्षी पावसाचे पाणी वाहून जाते. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी कृषी विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. पाणी पातळीत वाढ व्हावी म्हणून गावागावात पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मुकेश गव्हाणकर, अक्षय खंडेराव, अमित काळे, अमोल चौधरी, गोपाल सोनोने, प्रवीण बोर्डे, सुधाकर बोर्डे, पंकज सोनोने, शहजाद खान, साजिद शाह, संतोष गव्हाळे यांनी केली आहे.