खामगाव (बुलडाणा): अत्यल्प पावसामुळे अमरावती विभागातील तब्बल ७,२४१ गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. पाणी टंचाई निवारणार्थ राज्याच्या तिजोरीवर यावर्षी कोट्यवधी रुपयांचा भार पडण्याची शक्यता आहे.अतवृष्टीमुळे २0१३ मध्ये अमरावती विभागातील अनेक तालुक्यांमध्ये मुबलक पाणी साठा होता. त्यामुळे विभागातील काही गावे टँकरमुक्त झाली होती. यंदा मात्र अत्यल्प पाऊस पडला. परिणामी विभागातील तब्बल ७,२४१ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती आहे. त्यापैकी बहुतांश गावांना हिवाळ्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी राज्यातील काही तालुक्यांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला, तर काही तालुक्यांमध्ये २५ टक्यांपेक्षाही कमी पाऊस पडला. काही तालुक्यांमध्ये ५0 टक्यांच्या आत पाऊस पडला. कमी पावसाच्या पट्टयामध्ये अमरावती विभागातील अमरावती वगळता उर्वरित यवतमाळ, बुलडाणा, अकोला व वाशिम या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. अत्यल्प पावसामुळे या चार जिल्ह्यांमधील भूजल पातळी घटली आहे. अनेक जलसाठय़ांमध्येही अत्यल्प जलसाठा असल्याने, अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर, शासनाला पाणी टंचाई निवारार्थ पर्यायी स्त्रोतांबाबत उपाययोजना करावी लागणार असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करावी लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. *अनेक गावे झाली होती टँकरमुक्त!अतवृष्टीमुळे २0१२-१३ मध्ये विभागातील काही गावांमध्ये ओला दुष्काळ पडला होता. धरणे तुडूंब भरली होती. त्यामुळे अनेक गावे टँकरमुक्त झाल्याने, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला होता; मात्र यावर्षी परिस्थिती बिकट असल्यामुळे शासनाला पाणी टंचाई निवारण्यासाठी विशेष तरतूद करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
अमरावती विभागातील ७,२४१ गावांमध्ये पाणी टंचाई
By admin | Published: November 22, 2014 11:57 PM