संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा मंजूर होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र आराखड्यात प्रस्तावित ७१२ उपाययोजनांपैकी १९ एप्रिलपर्यंत केवळ २३ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, ६८९ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाइ निवारणाचा कृती आराखडा कागदावरच असल्याचे वास्तव आहे.
वाढत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागांत पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारी ते जूनअखेरपर्यंतच्या कालावधीकरिता जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपये खर्चाच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी गत ८ मार्च रोजी मंजुरी दिली. मंजूर कृती आराखड्यात जिल्ह्यातील ४९७ गावांसाठी पाणीटंचाई निवारणाकरिता विविध ७१२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी १९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात केवळ २३ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६८९ उपाययोजनांची कामे अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा कागदावरच असून, पाणीटंचाई निवारणासाठी प्रस्तावित उपाययोजनांची कामे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत केव्हा सुरू करण्यात येणार आणि टंचाईग्रस्त गावांमध्ये ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या केव्हा संपणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
कृती आराखड्यात प्रस्तावित अशा आहेत उपाययोजना!
तालुका गावे उपाययोजना
अकोला ८० ९५
बार्शीटाकळी १५ ३०
बाळापूर २२ ५१
पातूर ४७ ५९
मूर्तिजापूर ६२ ७३
अकोट ७५ ६७
तेल्हारा ३८ ७२
पूर्ण केलेल्या उपाययोजनांची
अशी आहेत कामे!
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात ७१२ उपाययोजनांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये विहिरी खोल करणे व गाळ काढणे ३६, विहिरींचे अधिग्रहण करणे २००, टँकरद्वारे पाणीपुरवठा १०, नळ योजनांची विशेष दुरुस्ती ७०, तात्पुरत्या पूरक नळ योजना ११, नवीन विंधन विहीर १८७ व नवीन कूपनलिका १४९ इत्यादी उपाययोजनांचा समावेश आहे. त्यापैकी केवळ २३ उपाययोजनांची कामे आतापर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये १४ विहिरींचे अधिग्रहण व ९ कूपनलिकांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
७७ उपाययोजनांच्या कामांना मान्यता!
पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार ७७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी केवळ १४ विहिरींचे अधिग्रहण आणि ९ कूपनलिकांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित कामे अद्यापही सुरु करण्यात आली नसल्याचे वास्तव आहे.