बोरगाव वैराळे : बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे येथे गत सहा महिन्यांपासून ‘बोअरवेल’चे पाणी आटल्यामुळे पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत असून, गावकऱ्यांना दररोज विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे.
बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे गाव खारपाणपट्ट्यात येत असून, सन २००० पासून पिण्यासाठी अकोला तालुक्यातील दुधाळा येथील बोअरवेलवरून पाणीपुरवठा होता; मात्र पाणी पुरवठा करणारा मोटरपंप दोन वर्षांपूर्वी बोअरवेलमध्ये अडकल्याने गतवर्षी नवीन बोअरवेल बोरगाव वैराळे शेतशिवारात खोदण्यात आली होती. या बोअरवेलचे पाणी आटल्यामुळे गावात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी उप-अभियंता पाणी पुरवठा विभाग बाळापूर, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद अकोला यांना निवेदन देऊन बोरगाव वैराळे येथे पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येथून नवीन बोअरवेल खोदण्याची मागणी केली आहे; मात्र बोअरवेल न खोदल्यामुळे गत सहा महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बोअरवेल खोदण्याची मागणी करीत सरपंच कल्पना विनायक वैराळे, उपसरपंच राजेश्वर वैराळे, ग्रामपंचायत सदस्य दीपाली बाहकर, शुभांगी अमरावते, पुष्पा वाकोडे, माणिकराव वानखडे, श्रीकृष्ण वेते यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिली आहे.
-------------------------
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणीटंचाईच्या निधीतून बोरगाव वैराळे गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी बोअरवेल खोदण्याचा प्रस्ताव दि. १० फेब्रुवारी २०२१ ला पाठविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यावर बोअरवेल खोदून पाणीटंचाई दूर करण्यात येईल.
-मिलिंद जाधव, उपकार्यकारी अभियंता बाळापूर.