अकाेला- उन्हाळ्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके साेसावे लागतात. यंदा वाढते तापमान लक्षात घेता पाणीटंचाईची तीव्रता कमी हाेण्यासाठी विहीर अधिग्रहरणाची प्रक्रिया सुरु आहे. पाणीटंंचाई उपाययोजनेअंतर्गत चार गावांतील नागरिकांसाठी चार विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरी खासगी असून त्यासाठी २ लाख ५५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
यंदा संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून ग्रामस्थांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा प्रशासनाला पाणीटंचाई निवारण कृती आराखडा सादर करण्यात आला हाेता. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. त्यामुळे संंबंधित गावांमध्ये पाणीटंंचाई निवारणाची कामे करण्याच्या मार्ग मोकळा झाला असून काही गावांमध्ये पाणीटंंचाई निवारणाची कामेसुद्धा करण्यात येत आहेत. त्यापैकी चार गावांसाठी चार विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विहीर अधिग्रहण अधिकारी म्हणून तहसीलदारांची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या आदेशानेच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. काही ठिकाणी तर ग्रामस्थांना २-३ कि.मी.अंतरावरून पायपीट करुन पाणी आणावे लागते. अनेक गावांत तर पाणी विकतही घ्यावे लागते. दिवसभर मुजरीसाठी राबल्यानंतर रात्री पाणी भरावे लागत असल्याचे चित्र गतवर्षी दिसून आले हाेते. त्यामुळे जिल्हा प्रशासन यावेळी सतर्क झाले आहे.