- संजय उमकमूर्तिजापूर : भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन तालुका स्तरावर एक शासकीय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पारा चढत आहे उन्हाची काहिली वाढत आहे. पिण्यासाठी होणारी जीवाची कासावीस तालुक्यात वाढली आहे. अशा भिषण परीस्थीतीत पाणी टंचाईचा कृती आराखडा कागदावर असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. प्रस्तावित ७ सात गावात भिषण पाणी टंचाई असल्याचे कृती आराखड्यात नमुद आहे; परंतू त्या गावांसाठी कुठलीही उपाय योजना करण्यात आली नसल्याने कृती आराखडा कागदावरच राहिला आहे. तालुक्यातील पाणी टंचाई लक्षात घेता संभाव्य उपाय योजना म्हणून ७५ गावांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील किनी, चिखली, सोनोरी (मूर्तिजापूर), जामठी (माटोळा ), कवठा (खोलापुर), बोरगाव (निंघोट), साखरी, निंभा या गावात पाणी टंचाईचे सावट आहे. या गावासाठी विहीरी अधिग्रहित करणे, नळ दुरुस्ती करणे आदी उपाय योजना प्रस्तावित आहे, कृती आराखड्या नुसार ७५ गावातील १० गावाच्या उपाय योजनेसाठी पाणी टंचाई उपाय योजना, १७ विहिरी अधिग्रहित, १३ विरहितील गाळ काढणे, ६ नळ योजना दुरुस्ती, ४० विंधन विहिरी व ११ कुपनलीका पाणी टंचाई उपाय योजना आराखडय़ात मंजूर करण्यात आल्या आहेत. संपुर्ण मागील वर्षी पावसाळ्यात ७११.२० मिलिमीटर येवढी पावसाची नोंद करण्यात आली आहे पाऊस गतवर्षीच्या तुलनेत अधिक प्रमाणात असला तरी विहीरी, विंधन विहिरींतील पाण्याची पातळी तळाला भिडली आहे. नद्या, बॅरेजेस मध्ये ठणठणाट असल्याने संपूर्ण तालुक्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुका शासकीय स्तरावर पुरक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यात उमा प्रकल्पावर कार्यान्वित असलेली एकमेव लंघापुर ५७ खेडी पाणी पुरवठा योजना असुन उमा प्रकल्प तुडुंब भरत असल्याने ही योजना तालुक्यासाठी जल संजीवनी ठरणार असली तरी ग्राहकांनी देयके नभरल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ३७ गावचा पाणीपुरवठा खंडित केल्याने या गावांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तर यावर्षी पासून यातील हातगाव, सोनोरी (मूर्तिजापूर ) व हेंडज तंत्रनिकेतन महाविद्यालय यांना करार तत्वावर पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जीवन प्राधिकरण कडून प्राप्त झाली आहे. या कृती आराखड्यात विशेषतः निम्म्याहून अधिक नदी काठचेच गावे असुन त्यामध्ये मुंगशी, शेलू नजीक, वाघजाळी, ताकवाडा, दापुरा, शिरताळा, बपोरी, सोनोरी, शेलू बाजार, सांगवी, रोहणा, बोर्टा, लंघापुर, यावरुन तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई चित्र स्पष्ट होते. कृती आराखड्यानुसार नळयोजना दुरुस्ती, टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरी अधिग्रहित करणे, विहिरीतील गाळ काढणे, विंधन विहिरी व कुपनलीका पाणी टंचाई उपाय योजनेसाठी १ लक्ष ५८ हाजार एवढा खर्च अपेक्षित आहे.
मूर्तिजापूर तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 5:40 PM