तालुक्यातील ग्रामीण भागात १०० गावे असून, यातील काही गावांच्या कडेलाच वाण धरण आहे. तर, या वाण धरणाच्या पायथ्याशी सुद्धा अनेक गावे आहेत. मात्र, या गावात अजूनही या धरणाचे पाणी जनतेला पिण्यास मिळाले नसून येथील जनतेचा घसा कोरडाच आहे. तसेच या गावांसह तालुक्याचा दक्षिण भाग हा खारपाणपट्टा समजला जातो. या भागातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक गावांत किडनीच्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत व शेतकऱ्यांच्या शेतीला सुद्धा हे पाणी पूरक नसल्याने या परिसरात नेर-धामना बॅरेज असून, यातील पाणी येथील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता मिळाले नाही. त्यामुळे तालुक्याच्या उत्तर दक्षिण दिशेला पाणी असूनही जनतेला पिण्याचे पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे.
पाणीटंचाई निवारणार्थ १ कोटींचा निधी
शासनस्तरावर दरवर्षी जानेवारी ते जून या महिन्यात ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवू शकते, त्याकरिता कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये तालुक्यातील ७४ गावांमध्ये पाणीटंचाई दर्शविण्यात आली असून, एप्रिल ते जून या महिन्यात ३६ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. यामध्ये विहीर अधिग्रहण ६ ठिकाणी असून, एका गावात तात्पुरती नळयोजना आणि ३५ नवीन कूपनलिका अशी योजना याकरिता १ कोटी २ लक्ष रुपये खर्च होणार आहेत.
या गावात आहे पाणीटंचाई
वरूड वडणेर, चितलवाडी, अडसूळ, जस्तगाव, कळमखेड, मालठाना, मालपुरा, खापरखेड, मनात्री बु, चांगलवाडी, पाथर्डी, टाकळी, थार, तळेगाव, तळेगाव, रायखेड, वाकोडी, दापुरा, निंबोळी, राणेगाव, पिवंदल, सांगवी, दानापूर, वारखेड, माळेगाव बाजार, चिचारी, चंदनपूर, नवी तलाई, भिली, बोरव्हा, उमरशेवडी, अंबाबरव्हा, सोमठाना, अडगाव बु, भांबेरी, मनब्दा.
तालुक्यातील पाणी बाहेर
तालुक्यातील पाणी इतर जिल्ह्यांत व जिल्ह्याच्या इतर ठिकाणी पळविण्यात आले. मात्र, या तालुक्यातील जनतेचाच घसा कोरडा ठेवून इतरत्र तालुक्यातील पाणी पळविले जात आहे. लोकप्रतिनिधींनी आतातरी पाठपुरावा करून तातडीने ग्रामीण भागात वाण धरणाची पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करून जनतेला पाणी द्यावे, हीच अपेक्षा आहे.
पाण्याची पातळी खोल गेल्याचा अहवाल!
शासन कूपनलिकांवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. मात्र, यामध्ये पाण्याची पातळी अनेक ठिकाणी खोल गेली असून, आणि त्यात शासनाने ठरवून दिलेली २०० मीटर खोल सिंचन उपसा क्षमता बघता, बोअरवेलला पाणी न लागता खर्च व्यर्थ जात आहे.
त्यात भूवैज्ञानिक यांनी यापूर्वी इतर तालुक्यांच्या तुलनेत या तालुक्याची पाण्याची पातळी खोल गेल्याची नोंद केली.