वल्लभनगर : परिसरात खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो; मात्र गत महिनाभरापासून परिसरातील पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वल्लभनगर परिसरातील निभोंरा, सांगवी खु. हिंगणा, तामसवाडी, गोपालखेड, सांगवी बु. या गावांमध्ये खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. गत महिनाभरापासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात काही नागरिकांकडे पाणी साठवणुकीसाठी साहित्य नसल्याने त्यांना गावाच्या बाहेरून तळ्यातून पाणी आणून प्यावे लागत असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन नागरिकांना जनजागृती करण्यात येत आहे. गावातील विवेक गावंडे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे पाणीपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील समस्या जैसे थे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
-----------------------------
ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
गत महिनाभरापासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. आरोग्य विभागामार्फत पाणी उकळून प्यावे आदी सूचना दिल्या जात आहेत. धरणात पाणी मुबलक असतानाही पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त होत आहे.