निहिदा: बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजरनजीक असलेले वडगाव येथे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरुळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वडगाव येथे जलस्वराज योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो; मात्र येथील कर्मचारी १० ते १२ दिवसानंतर पाणी सोडत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मुबलक पाणी असतानाही काही कारणे पुढे करीत नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप शाहिनाथ बाबर यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार दिली असून, तक्रारीत कर्मचारी हा नियमित पाणी सोडत नसल्याचा आरोप केला आहे. वडगावात ३ हातपंप असून, दोन बंद अवस्थेत आहे. त्यापैकी एकच सुरू असल्याने या हातपंपावर गर्दी निर्माण होत असून, महिलांमध्ये वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जलस्वराज योजनेंतर्गत पाणी पुरवठा सुरुळीत करावा, अशी मागणी शाहिनाथ वामन बाबर, साईनाथ चव्हाण, कैलास चव्हाण, लीलाबाई शिंदे, अजय सळे दार, अनिकेत निलखंन, मुकुंदा निलखन यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (फोटो)
-------------
वडगाव येथील नागरिकांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याविरुद्ध पाणी नियमित सोडत नसल्याबाबत तक्रार केली आहे, याबाबत चौकशी करून त्यास नोटीस देऊन कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
-किशोर काळबांडे, गट विकास अधिकारी प. सं. बार्शीटाकळी.